Breaking News

ऑनलाइन शिक्षण सुरू, पण स्मार्टफोन आणि इंटरनेटचे विघ्न

पाली : प्रतिनिधी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र स्मार्टफोनचा अभाव आणि इंटरनेटचा व्यत्यय यामुळे ऑनलाइन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडी व वस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे दुरापास्त झाले आहे. परिणामी कोणी स्मार्टफोन देते का स्मार्टफोन असे बोलण्याची वेळ पालक व शिक्षकांवर आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी व पालकांकडे  स्मार्टफोन नसल्याने विद्यार्थी ज्ञानकण गिरवणार कुठे हा प्रश्न भेडसावत आहे. मागील वर्षी भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यात असे आढळून आले की विद्यार्थ्यांचा वर्गाच्या तुलनेत ऑनलाइन तासात सहभाग हा 56 टक्के असमाधानकारक तर शिक्षकांच ऑनलाइन शिकवण्याचा अनुभव हा 74 टक्के असमाधानी आलाय. त्यातून काही निष्कर्ष असे की, प्रशिक्षण गरज, कमी उपस्थिती, डेटा आवश्यक, प्रश्नाचे निराकरण अशक्य, गृहपाठ अपूर्ण त्यामुळे 70 टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाबद्दल असमाधानी आहेत. स्मार्टफोन व इंटरनेटचा अभावामुळे शिक्षकांना ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही मार्गाने जावे लागतेय, असे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेंद्र आंबिके यांनी सांगितले. वांगणी माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक टिळक खाडे यांनी सांगितले की, ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणारा स्मार्टफोन ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे नसल्यामुळे हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. काही दुर्गम व डोंगराळ भागात इंटरनेट व मोबाइल नेटवर्क नसल्यामुळेही ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत आहेत. कोरोनामुळे शाळेतील बंद असलेले अध्ययन- अध्यापन व ऑनलाइन शिक्षणातील अडथळ्यांची शर्यत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड होत आहे. ग्रामीण भागातील पालक महागडा स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा आपल्या मुलांना उपलब्ध करुन देऊ शकत नाहीत. त्यामुळेच शिक्षकांसमोर ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे, असा प्रश्न पडला आहे.

स्मार्टफोन, इंटरनेट नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत आहेत. अध्ययन-अध्यापनाचे व्हिडीओ किंवा लिंक विद्यार्थ्यांना पाठवता येत नाही. त्यामुळे शक्य तिथे स्वाध्याय पुस्तिका देणार. -सरिता सावंत, मुख्याध्यापिका, आश्रमशाळा वावळोली, सुधागड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच यंदादेखील विद्यार्थ्यांचे शिकणे ऑनलाइन सुरू आहे. शाळा बंद पण शिकणे सुरू हा उपक्रम राबविला जात आहे. पहिली ते नववीच्या शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती 50 टक्के आहे आणि 10 व 12वीच्या शिक्षकांची उपस्थिती 100 टक्के आहे. -कल्पना काकडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. रायगड

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply