Breaking News

उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील बोलिव्हियाचे आव्हान संपुष्टात

क्यूबा ः वृत्तसंस्था
प्रमुख आक्रमणपटू एडिन्सन कव्हानीने तब्बल सात महिन्यांनंतर झळकावलेल्या पहिल्या गोलच्या बळावर उरुग्वेने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. अ गटातील या लढतीत उरुग्वेने 2-0 असा विजय मिळवून बोलिव्हियाचे आव्हान स्पर्धेतून संपुष्टात आणले.
क्यूबा येथील एरिना पँटानल येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात 40व्या मिनिटाला बोलिव्हियाचा गोलरक्षक जेरो क्विंटेरोसकडून स्वयंगोल झाल्यामुळे उरुग्वेला आघाडी मिळाली. त्यानंतर दुसर्‍या सत्रात 79व्या मिनिटाला टोरेसने दिलेल्या पासचे कव्हानीने गोलमध्ये रूपांतर करून उरुग्वेच्या स्पर्धेतील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नोव्हेंबरमध्ये उरुग्वेसाठी अखेरचा गोल करणार्‍या कव्हानीला उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर सूर गवसल्यामुळे संघाची चिंता कमी झाली आहे. याशिवाय गोल केल्यानंतर त्याने अनोख्या पद्धतीत केलेल्या जल्लोषाविषयी समाजमाध्यमांवर चर्चा रंगत आहे.
या विजयामुळे उरुग्वे सध्या अ गटात तीन सामन्यांतून चार गुणांसह चौथ्या स्थानी आहे. बोलिव्हियाला सलग तीन सामने गमवावे लागल्याने ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. उरुग्वेची मंगळवारी होणार्‍या अखेरच्या साखळी लढतीत पॅराग्वेशी गाठ पडणार आहे. त्याच दिवशी बोलिव्हियासमोर अग्रस्थानावरील अर्जेटिनाचे कडवे आव्हान असणार आहे.
पॅराग्वे, चिलीही पुढील फेरीत
पॅराग्वेने बलाढ्य चिली संघाला 2-0 अशी धूळ चारून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, परंतु चिलीने पराभवानंतरही पुढील फेरी गाठली आहे. पॅराग्वेसाठी ब्रायन सामुडिओ (33वे मिनिट) आणि मिगुएल अल्मिरोन (58 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पॅराग्वेच्या खात्यात तीन सामन्यांत सहा, तर चिलीच्या नावावर चार लढतींमध्ये पाच गुण आहेत. बोलिव्हियाचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे चिलीच्या बाद फेरीचा मार्ग मोकळा झाला. आता पॅराग्वेने अखेरच्या लढतीत उरुग्वेला नमवले आणि बोलिव्हियाने अर्जेटिनाला किमान बरोबरीत रोखले, तर पॅराग्वे गटात अग्रस्थान पटकावू शकते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply