Breaking News

गूड न्यूज! भारतात येणार चौथी कोरोना प्रतिबंधक लस

‘मॉडर्ना’च्या आयातीला मंजुरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असून गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण सुरू आहे, मात्र तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशात लवकरच कोरोना प्रतिबंधक चौथी लस उपलब्ध होणार आहे. भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) मॉडर्ना लसीच्या आयातीला मंजुरी मिळाली आहे.
डीसीजीआयने सिप्ला कंपनीला मॉडर्ना लस आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळू शकते, अशी माहिती वृतसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सध्या देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसींचा वापर सुरू आहे. त्यातील स्पुटनिक व्ही रशियन आहे, तर इतर दोन लसींचे उत्पादन भारतात होत आहे. मॉडर्नाच्या आपत्कालीन वापरास लवकरच परवानगी अपेक्षित आहे. तसे झाल्यास ती देशातील चौथी लस ठरेल.
कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट समोर येत असताना आणि त्यामुळे चिंतेत भर पडत असताना मॉडर्ना लसीबद्दल सकारात्मक माहिती पुढे आली आहे. मॉडर्ना लस कोरोना विषाणूविरोधात आयुष्यभर संरक्षण देऊ शकते. ही लस घेतल्यानंतर कोरोना विषाणूविरोधात अतिशय मजबूत रोगप्रतिकाशक्ती तयार होते, अशी माहिती संशोधनातून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
90 टक्के प्रभावी
कोरोना विषाणूच्या दोन व्हेरिएंटविरोधात मॉडर्ना लसीची चाचणी घेण्यात आली. त्या दोन्ही व्हेरिएंटविरुद्ध मॉडर्ना लस प्रभावी ठरली. कोरोना लस टोचण्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरात मुबलक प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या. त्यामुळे मॉडर्ना लस घेणार्‍या व्यक्तींना कोरोनापासून अनेक वर्षे किंवा आजीवन संरक्षण मिळू शकते. याशिवाय ही लस घेणार्‍यांना बूस्टर डोस घेण्याचीदेखील गरज भासणार नाही, असे संशोधकांचे मत आहे तसेच कोरोनाविरुद्ध ही लस 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे, असाही दावा करण्यात आला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply