नवी मुंबई : प्रतिनिधी
सीबीडी बेलापूर पामबीच मार्गालगत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा प्रधान सचिव यांच्याकडे केली. राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद यांच्या मुख्यालयाच्या नामकरणाचे ठराव राज्य शासनाकडे प्रलंबित असून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या नामकरणाचा ठराव गेलेला नसल्याने ही मागणी करण्यात आली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवी मुंबईतील धर्मवीर संभाजी महाराज घाऊक भाजीपाला महासंघ, छत्रपती संभाजी महाराज उत्सव मंडळ, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान अशा विविध सामाजिक संघटनांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. या वेळी एपीएमसीचे संचालक शंकरशेठ पिंगळे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉ. राजेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, गणेश पावगे, दादा झेंडे आदी उपास्थित होते.या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द तेजोमय होती.छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती जनसामान्यांच्या मनात कायम रुजू व्हावी, याकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या या वास्तूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याकरिता अनेक संस्था, संघटना तसेच शिवप्रेमी, शंभुप्रेमींची मागणी होती. या लोकभावनेतून ही मागणी करण्यात आली असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून ही मागणी केली आहे. धर्मवीर संभाजी राजे यांचा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीला प्रोत्साहित ठरेल, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी या वेळी बोलताना सांगितले.