शेकापच्या टीकेचा रविशेठ पाटील यांनी घेतला समाचार
कळंबोली : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेतील रोडपाली गावाचा स्मार्ट व्हिलेज अंतर्गत सर्वांगीण विकास होण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा व नगरसेविका प्रमिला पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तेव्हा रोडपाली गावच्या विकासाची नतद्रष्ट शेकापने काळजी करू नये. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे नगरसेवक विकासाची गंगा रोडपाली गावात आणत आहेत, मात्र शेकापची काही विघ्नसंतोषी मंडळी त्यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दांत त्यांचा भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी समाचार घेतला आहे.
रविशेठ पाटील म्हणाले की, रोडपाली गाव व कळंबोली शहराचा विकास करण्यासाठी भाजपचे नगरसेवक हे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. रोडपाली गावाला दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून तिन्ही नगरसेवकांनी आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्याने रोडपाली हे स्मार्ट व्हिलेजमध्ये समाविष्ट झाले आहे. त्यानुसार या गावात सुविधा देण्याचे काम सुरू आहे. ते 25 टक्के पूर्णही झाले. मध्यंतरी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे काम थांबले होते, पण आता सुरू आहे. विकास म्हणजे काय असतो, हे भाजपच्या नगरसेवकांनी दाखवून दिले आहे.
रोडपाली गावचा विकास करताना सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले. ते उभारून आठ-नऊ महिने झाले. हे शौचालय महापालिकेतर्फे संस्थेला चालवायला देण्यात येणार असून, त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच हे शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध होईल. गावासाठी स्मार्ट सिटीला साजेशी अशी स्मशानभूमी बांधण्याची योजना आहे. तिचीही निविदा काढण्यात आली असून, तिचे काम काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. अशी एकापेक्षा एक कामे आम्ही करणार आहोत. त्यामुळे शेकापने त्याची चिंता करू नये. भाजपचे नगरसेवक सक्षम आहेत. आम्ही तुमच्यासारखे नारळ फोडून शो बाजी करीत नाही, तर कर्तृत्वाने कामे करून दाखवितो, असा टोला शेवटी रविशेठ पाटील यांनी शेकापवाल्यांना लगावला आहे.