महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये पदांच्या वाटपावरून अंतर्गत धुसफूस असतेच. विधानसभाध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्या पदावर काँग्रेसचाच नेता बसणार हे उघड असले तरी या बाबतीत होणारे राजकारण थांबायला तयार नाही. खुद्द काँग्रेस पक्षातच विधानसभाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव सुचवायचे यावरून अद्यापही एकमत झालेले दिसत नाही.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आलेले असताना सत्ताधारी महाविकास आघाडीतील संभ्रम नाट्याचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. अखेरचा आणि तिसरा अंक बहुदा ऐन अधिवेशन काळात किंवा त्यानंतर लगेचच पार पडेल अशी चिन्हे आहेत. गेली दीड वर्षे सत्तेचे लोणी चाखणार्या महाविकास आघाडी सरकारमधले अंतर्विरोध याआधीही वेळोवेळी प्रकट झाले आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन म्हटले की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात बहुदा गोळा येतो. त्यामुळे कोरोनाचे निमित्त पुढे करून पाच व सहा जुलै रोजी होणारे अधिवेशन दोन दिवसात गुंडाळण्यात येणार असल्याने या 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे किती प्रश्न मार्गी लागणार हा एक प्रश्नच आहे. आगामी अधिवेशनामध्ये विधानसभाध्यक्षांची निवडणूक घेणे आवश्यक आहे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने माननीय राज्यपालांना भेटून केली होती. त्यानुसार राज्यसरकारला माननीय राज्यपालांनी स्मरण करून दिले आणि ही बाब महत्त्वाची असल्याचे नजरेस आणून दिले. काँग्रेस पक्षाचे भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची नावे विधानसभाध्यक्ष पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा होती. येत्या अधिवेशनात विधानसभाध्यक्ष ठरेलच अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. परंतु येत्या अधिवेशनामध्ये विधानसभाध्यक्ष पदाची निवडणूक घ्यायची झाली तर माननीय राज्यपालांना तसे तातडीने कळवावे लागणार हे लक्षात आल्यानंतर सगळेच मुसळ केरात गेल्यासारखे झाले. आता विधानसभाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा संभ्रम आणखीनच वाढला आहे. हे संभ्रम नाट्य कमी पडले म्हणून की काय अधिवेशनाचा मुहुर्त साधून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी खुद्द आपल्याच पक्षाच्या मंत्र्याला आरोपाच्या जाळ्यात अडकवल्याची बातमी समोर आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या पठडीतील अननुभवी निकटवर्तीयाला महाजेनकोचे कंत्राट दिल्याचा आरोप पटोले यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असे सांगण्यात येते. अर्थात पटोले यांनी मात्र राऊत यांच्याविरोधात तक्रार केल्याचा इन्कार केला आहे. गेल्या अधिवेशनामध्ये सचिन वाझे प्रकरण गाजले होते. यंदाच्या अधिवेशनात नामदार नितीन राऊत यांच्यावर वीज कोसळणार अशी चिन्हे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारसा समन्वय नाही. हे दोन्ही पक्ष गेली अनेक वर्षे मित्र पक्ष म्हणून मिरवत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांमधील संबंध काहिसे तणावपूर्णच राहिलेले आहेत. शिवसेना या दोन्ही पक्षांचा नवा मित्र आहे. त्यामुळे एकमेकांचा अंदाज घेत घेत रणनीती ठरवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न अखेर संभ्रमामध्ये रूपांतरित होतो ही वस्तुस्थिती आहे. किमान 172 आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करणार्या महाविकास आघाडीला भाजपचे 105 आमदार घाम का फोडतात हे अनाकलनीय आहे. हे संभ्रम नाट्य लवकरात लवकर संपून सत्ताधारी जनतेचे प्रश्न मार्गी लावतील एवढीच अपेक्षा आहे.