Breaking News

फार्मा पार्क प्रकल्पाबाबत राज्य शासनाची भूमिका दुटप्पी

  • अ‍ॅड. महेश मोहिते यांचा आरोप
  • राज्यपालांना भेटून भूमिका मांडणार

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प येणार नाही असे राज्य शासन सांगते. त्याचवेळेस स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य शासन या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेऊन स्थानिक शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे, असा आरोप भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केला. ते अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी मुरूड आणि रोहा तालुक्यातील 15 गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे, मात्र त्यास स्थानिकांचा विरोध आहे.  मुख्यमंत्र्यांची वेळ मागूनही ते स्थानिक शेतकर्‍यांना भेटत नाहीत. त्यामुळे 3 जुलैला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आम्ही भेट घेणार असून केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांच्याकडेही जाऊन स्थानिकांची भूमिका मांडणार असल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी या वेळी सांगितले.
आमचा प्रकल्पाला विरोध नाही. या प्रकल्पासाठी शेतजमिनी घेण्यास आमचा विरोध आहे. रायगड जिल्ह्यात यापूर्वी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या हजारो एकर जमिनी वापराविना पडून आहेत. या जागांवर प्रकल्पाची उभारणी व्हावी, असे अ‍ॅड. मोहिते म्हणाले.
प्रकल्प नको यासाठी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांची भेट घेतली. त्यांना निवेदने दिली. उद्योगमंत्र्यांचीही भेट घेतली. प्रत्येक वेळी स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प येणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले, मात्र दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊन प्रकल्पाला मंजुरी द्या, अशी मागणी करतात. नंतर प्रकल्पासाठी मुंबईत लोकप्रतिनिधींची आढावा बैठकही घेतली जाते. खासदार सुनील तटकरे यांनीही प्रकल्पाला मंजुरी द्या, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, याकडे अ‍ॅड. मोहिते यांनी लक्ष वेधले. (पान 2 वर..)
मुळात केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नसताना प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया पुढे रेटली जात आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. तसा आक्षेपही त्यांनी वेळोवेळी आंदोलन करून आणि निवेदन देऊन घेतला आहे. भूसंपादन प्रक्रियेवरही हरकती नोंदविण्यात आल्या आहेत, मात्र तरीही शेतकर्‍यांचा विरोध डावलून प्रकल्प पुढे रेटला जात आहे. ज्या जमिनी शेतकर्‍यांच्या नावावर होत्या त्या जमिनी शासकीय असल्याचे दाखवून घेतल्या जात आहेत, असा आरोप अ‍ॅड. मोहिते यांनी केला. प्रकल्पविरोधी लढ्यात भाजप शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Check Also

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूरदरम्यान लवकरच ई-वॉटर टॅक्सीसेवा होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर या मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर …

Leave a Reply