लंडन ः वृत्तसंस्था
जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी आणि अमेरिकेची कोको गॉफ यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरामात विजय
मिळवून तिसर्या फेरीत प्रवेश केला. एलिना स्विटोलिनाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चौथ्या मानांकित झ्वेरेव्हने पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेनवर 7-5, 6-2, 6-3 असे सरळ तीन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. सहाव्या मानांकित फेडररने रिचर्ड गॅस्क्वेटला 7-6, (7-1),6-1, 6-4 असे नमवले. सातव्या मानांकित मॅट्टेओ बेरेट्टिनीने व्हॅन डी झँडस्कल्पला 6-3, 6-4, 7-6 (7-4) असे पराभूत केले. दुसर्या मानांकित मेदवेदेवने कालरेस गार्फियावर 6-4, 6-1, 6-2 अशी धूळ चारली.
जपानचा केई निशिकोरी आणि 18वा मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना मात्र स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनने निशिकोरीवर 7-5, 6-4, 5-7, 6-3 असा विजय मिळवला, तर अलेक्झांडर बब्लिकने दिमित्रोव्हवर 6-4, 7-6 (8-6), 7-6 (7-4) अशी संघर्षपूर्ण लढतीत सरशी साधली.
महिला एकेरीत अग्रमानांकित बार्टीने अॅना ब्लिन्कोव्हाला 6-4, 6-3 असे नेस्तनाबूत केले. किशोरवयीन गॉफने एलिना वेस्निनाला 6-4, 6-3 असे हरवले. बिगरमानांकित मॅग्डा लिनेटने तिसर्या मानांकित स्विटोलिनाला 6-3, 6-4 असे नमवून धक्कादायक विजयाची नोंद केली. फ्रेंच स्पर्धेची विजेती बाबरेरा क्रेजिकोव्हाने आंद्रेया पेटकोव्हिचवर 7-5, 6-4 अशी मात केली. अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाने क्रिस्टिना प्लिस्कोव्हाचा 6-3, 6-3 असा धुव्वा उडवला.
Check Also
आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …