निर्बंध काही प्रमाणात शिथिल
अलिबाग ः प्रतिनिधी
संपूर्ण रायगड जिल्ह्याने आता कोरोनाच्या तिसर्या स्तरात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध जिल्ह्यात शनिवार (दि. 7)पासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने महाराष्ट्र शासनाने राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी केली. रायगड जिल्हाचा रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राचा समावेश चौथ्या स्तरात होता, तर जिल्ह्याचा नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात असलेला भाग तिसर्या स्तरात होता. शनिवारपासून रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्राचाही तिसर्या स्तरात प्रवेश झाल्यामुळे आता संपूर्ण जिल्हा तीसर्या स्तरात आला आहे.
जिल्ह्याने तिसर्या स्तरात प्रवेश केल्यामुळे शनिवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने तसेच आस्थापना संपूर्ण आठवडाभर दुपारी 4पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक बाबींशी निगडीत नसलेली दुकाने तसेच आस्थापना सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. उपहारगृह एकूण क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असतील. दुपारी 4 नंतर तसेच शनिवार व रविवार पार्सल व घरपोच सेवाच देता येईल. सार्वजनिक ठिकाणी व मोकळ्या जागेत संपूर्ण आठवडा सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत चालणे व सायकलिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाह्य मैदानी खेळास सकाळी 5 ते 9 तसेच सायंकाळी 6 ते 9 संपूर्ण आठवडाभर मान्यता देण्यात आली आहे.
व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर काही अटींच्या आधीन राहून दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येणार आहेत. सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या उपस्थितीत आयोजित करता येतील. शनिवार व रविवार असे कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असेल. लग्न समारंभासाठी 50पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. कृषिविषयक वस्तूंची तसेच सेवांची दुकाने व आस्थापना आठवडाभर दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केलेल्या आदेश म्हटले आहे.
फणसाड अभयारण्य खुले
मुरूड ः मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य पुन्हा खुले झाले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोविड-19 नियमांचे पालन करून या अभरण्यात प्रवेशास परवानगी दिली आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमी, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात येऊन मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य पर्यटक व वन्यजीवप्रेमींसाठी बंद ठेवण्यात आले होते. जूनपासून शासनाकडून अनलॉक करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्या अनुषंगाने उपवनसंरक्षक (वन्यजीव) यांनी वन्यजीवप्रेमी व पर्यटकांची अभयारण्य सुरू करण्याबाबत होत असलेली मागणी पाहून अभयारण्य क्षेत्र व पायवाटा कोरोना नियमांच्या अधीन राहून खुल्या करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती पत्रान्वये केली होती. ती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्य करीत फणसाड अभयारण्य खुले केले आहे. अभयारण्यात प्रवेशासाठी पर्यटक व वन्यजीवप्रेमींना मास्क परिधान करणे व योग्य शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे तसेच त्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
शासकीय आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्ती ही दंडात्मक कारवाई तसेच भा. दं. वि. कलम 188, 269, 270, 271, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 51सह अन्य तरतुदींनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहिल, असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, फणसाड अभयारण्य खुले झाल्याने येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले व सर्व कर्मचार्यांनी आनंद व्यक्त केला, तर पर्यटक व वन्यजीवप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.