Breaking News

फार्मा पार्क प्रकल्पात लक्ष घालणार

शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांचे आश्वसन

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज फार्मा पार्क प्रकल्पात आपण लक्ष घालू आणि स्थानिक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.
मुरूड व रोहा या तालुक्यातील वाघूळवाडी ते तळेखार विभागात असलेल्या 15 गावांची जमीन संपादित करून तेथे फार्मा पार्क प्रकल्प उभारला जाणार आहे, मात्र त्यास स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. या संदर्भात शनिवारी (दि. 3) भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गार्‍हाणे मांडले. भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत, राजेंद्र  सुतार, महेश म्हात्रे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश महाडिक यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता. या वेळी अ‍ॅड. मोहिते यांनी राज्यपालांना प्रस्तावित फार्मा प्रकल्पाबाबत माहिती दिली.
स्थानिक शेतकर्‍यांचा फार्मा प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध आहे. आपण या प्रकल्पात लक्ष घालावे आणि स्थानिक शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती अ‍ॅड. मोहिते यांनी केली. ही विनंती राज्यपालांनी मान्य केली. प्रस्तावित फार्मा प्रकल्पाची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मागवून घेऊ आणि यातून मार्ग काढून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यपालांनी दिले.
आमचा विरोध आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवावा, अशी मागणी भूमिपुत्र सामाजिक संस्थेने राज्यपालांकडे केली.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply