पाली ः प्रतिनिधी
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मिशन 100 आदर्श शाळांतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात रायगड जिल्ह्यामधून सुधागड तालुक्यातील राजिप नवघर शाळेची निवड झाली आहे. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी तीन लाख 60 हजारांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामधून या अभियानांतर्गत फक्त चार शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधागड तालुक्यातील राजिप शाळा नवघर, माणगाव तालुक्यातील राजिप शाळा मुठवली तर्फे तळे, म्हसळा तालुक्यातील राजिप शाळा खरसई आणि पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील राजिप शाळा कापडे बुद्रुक या शाळांची निवड करण्यात आली आहे. ह्या शाळांना अनुक्रमे तीन लाख 60 हजार, तीन लाख 21 हजार, तीन लाख 20 हजार आणि तीन लाख 13 हजार निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या निधीचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांकरिता आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. शाळेला आतापर्यंत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी तसेच अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. स्वदेस फाऊंडेशनच्या सर्व योजना शिक्षक स्वखर्चाने राबवत आहेत. सर्व उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक जगदिश म्हात्रे, शिक्षक प्रमोद म्हात्रे, वृषाली केळुसकर, राकेश गदमले, शीतल पाटील, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र जाधव आणि ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.