बीसीसीआयकडून मेगा ऑक्शनची तयारी; मुंबई इंडियन्समध्येही होणार बदल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येणार आहेत. त्याच वेळी आता बीसीसीआयने आयपीएल 2022साठीच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022ची ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यात आयपीएलमध्ये दोन नव्या फ्रँचायझी, खेळाडूंचे रिटेंशन, मेगा ऑक्शन, फ्रँचायझीच्या सॅलरी पर्समध्ये वाढ व मीडिया राइट्सबाबत बीसीसीआयने काही निर्णय घेतले आहेत.
पुढील पर्वात दोन नवीन फ्रँचायझी दिसणार हे निश्चित आहे आणि त्यासाठी मेगा ऑक्शन घेण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतराला याबाबतची घोषणा करण्यात येईल आणि ऑक्टोबर मध्यंतरापर्यंत नव्या फ्रँचायझींसाठी बोली लावता येणार आहे. कोलकाता येथील आरपी संजीव गोएंका ग्रुप आणि अहमदाबादचे अदानी ग्रुप या दोन फ्रँचायझी अनुक्रमे हैदराबाद व गुजरात संघासाठी उत्सुक आहेत.
बीसीसीआयने या मेगा ऑक्शनसाठी सॅलरी पर्स 85 कोटींहून 90 कोटींपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे एकूण 10 फ्रँचायझींसाठी बीसीसीआयने पर्समध्ये 50 कोटींची वाढ केली आहे. यापैकी 75 टक्के रक्कम ही ऑक्शनमध्ये खर्च करणे फ्रँचायझीला भाग आहे. पुढील तीन वर्षांत सॅलरी पर्समधील रक्कम 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येईल. मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम राखता येईल. या चारपैकी तीन खेळाडू भारतीय असतील व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असे असू शकतील.
फ्रँचायझी ज्या खेळाडूंना संघात कायम राखतील त्या खेळाडूंच्या पगाराएवढी रक्कम फ्रँचायझीच्या सॅलरी पर्समधून वजा करण्यात येईल. बीसीसीआयच्या प्लेअर रिटेशन नियमानुसार प्रत्येक संघाला चार प्रमुख खेळाडूंनाच कायम राखता येईल. त्यानुसार जर फक्त मुंबई इंडियन्सचाच विचार केल्यास रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड व क्विंटन डी कॉक किंवा रोहित, जसप्रीत, हार्दिक पांड्या व किरॉन असे चार खेळाडूच रिटेन केले जाऊ शकतात.