मुंबई ः प्रतिनिधी
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादग्रस्त ठरला. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सत्ताधार्यांना धारेवर धरले होते.
त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा भरण्याची घोषणा केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप करून घोषणेची पोलखोल केली.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करीत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. या वेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकरची सुसाइड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार एमपीएससीबाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुले परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
अशा वेळी सरकार व आयोग नेमके काय करतेय, असा सवाल फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.
या वेळी फडणवीसांनी विधानसभेबाहेर येत अजित पवारांनी केलेल्या घोषणेवर गंभीर आरोप केला. पवारांनी जी 31 जुलैपर्यंत एमपीएससीतील रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली, ती म्हणजे परीक्षा दिलेल्या उमेदवारांची भरती नव्हे, तर संस्थेत रिक्त असलेली पदे भरण्याची असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. एमपीएससी संस्थेत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी मुदत कशाला लागते, ती कधीही भरता येतात, असा आरोप करत ही फसवी घोषणा असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसींच्या इम्पेरिकल डेटावरही त्यांनी आक्षेप घेतले. पॉलिटिकल इम्पेरिकल डेटा राज्याने तयार करायचा असतो, केंद्राने नाही. केंद्राकडून मागण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची दिशाभूल कशासाठी, असेही फडणवीस यांनी विचारले.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …