Breaking News

भीमाशंकर अभयारण्यात ट्रेकर्स भरकटले; मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलिसांची शोधमोहीम

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

 भीमाशंकरला गेलेले पनवेल कामोठे येथील पाच ट्रेकर्स तेथील अभयारण्यात रस्ता चुकले. रात्रीच्या अंधारात घाबरलेल्या या ट्रेकर्सनी हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता नेरळ पोलीस भीमाशंकर अभयारण्यामध्ये पोचले. त्यांनी भरकटलेल्या ट्रेकर्सना शोधून काढले आणि खांडस येथे सुखरूप आणले. पनवेल कामोठे येथील एक लहान मुलगा, चार महिला आणि अन्य चार असे नऊ पर्यटक मंगळवारी (दि. 6) ट्रेकिंगसाठी कर्जत तालुक्यातील खांडस येथून भीमाशंकर अभयारण्य गेले होते. मात्र अंधार झाल्याने आणि माहितगार सोबत नसल्याने ते रस्ता चुकले व अभयारण्यात भरकटले. अंधार आणि रातकिड्यांच्या  कर्कश आवाजामुळे या ट्रेकर्सपैकी लहान मुलगा आणि महिला घाबरून गेल्या. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर  त्या ट्रेकर्संच्या मोबाइलवर नेटवर्क आले आणि त्यांनी मदतीसाठी पोलीस हेल्पलाईनवर फोन केला. भीमाशंकर अभयारण्याचा सदरचा भाग नेरळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतो. तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी कळंब आउट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे यांच्याशी संपर्क साधला. रात्री 10च्या नंतर केतन सांगळे, पोलीस शिपाई योगेश गिरी, निरंजन दवणे, होमगार्ड मनीष खुणे हे खांडस गावात पोहचले आणि तेथे त्यांनी अंभेरपाडा गावचे पोलीस पाटील भारती खटके आणि खांडस ग्रामपंचायत सदस्य अंकुश ऐनकर यांची मदत घेऊन भीमाशंकर अभयारण्य चा रस्ता चालण्यास सुरुवात केली. मध्यरात्री दोन वाजता त्या नऊ पर्यटकांचा शोध पोलिसांना लागला.जंगलात अत्यंत आडवाटेला हे ट्रेकर्स अडकून पडले होते. त्यांना पोलिसांनी सोबत नेलेली बिस्किटे, पाणी दिले आणि  खाली आणण्यास सुरुवात केली. बुधवारी पहाटे खांडस येथे आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना चहा देऊन आराम करायला सांगितले. सकाळी ते पनवेल कामोठे येथे परतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply