Breaking News

इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंकडून कोरोना प्रोटोकॉल धाब्यावर

लंडन ः वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला तातडीने इंग्लंडचा संघ बदलण्याची वेळ आली. पाकिस्तानविरुद्ध होणार्‍या मालिकेसाठी संघात 11 खेळाडूंना मोठ्या मुश्किलीने मिळवता आले, पण दुसर्‍या बाजूला इंग्लंडमध्ये असलेले भारतीय खेळाडू मात्र कोरोना प्रोटोकॉल धाब्यावर बसवत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय खेळाडू सुटीवर आहेत आणि ते इंग्लंडमध्ये फिरत आहेत, पण या खेळाडूंना मास्क लावण्याची गरज वाटत नाही. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री युरो कपची सेमीफायनल झाली. या सामन्यात इटलीने स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना पाहण्यासाठी बेम्बली स्टेडियमवर भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील उपस्थित होता. बुमराहसोबत त्याची पत्नीही होती. या दोघांचे फोटो बुमराहने सोशल मीडियावर पोस्ट केले, पण हजारोंच्या संख्येने लोक असताना या दोघांनी मास्क घातले नव्हते. युरो कपशिवाय टेनिसमधील प्रतिष्ठेची अशी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फिरकीपटू आर अश्विन गेले होते. या दोघांनीदेखील फोटो शेअर केले होते, पण त्यात मास्क घातलेले दिसत नव्हते. इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणार्‍या अनेक भारतीय खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यात सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांचे कुटुंबासह फोटोदेखील होते, तर ऋषभ पंतही इंग्लंड आणि जर्मनी यांच्यातील सामना पाहण्यासाठी उपस्थित होता. तेव्हा पंतने मास्क घातला नव्हता आणि त्यावर जोरदार टीका झाली होती. भारत व इंग्लंड याच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी नॉटिंघम येथे 4 ते 8 ऑगस्ट, दुसरी कसोटी लॉर्ड्स मैदानावर 12 ते 16 ऑगस्ट, तिसरी कसोटी लीड्सवर 25 ते 29 ऑगस्ट, चौथी कसोटी ओव्हलवर 2 ते 6 सप्टेंबर आणि अखेरची कसोटी मॅनचेस्टर येते 10 ते 14 सप्टेंबर या काळात होणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply