नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. काही दिवसांत पालिकेला पहिल्या टप्प्यात 10 हजार स्पुटनिक लस कुप्या मिळणार आहेत.नवी मुंबईत पालिका प्रशासनाने तिसर्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी लसीकरण केंद्रे व मनुष्यबळ तयार ठेवण्यात आले आहे, मात्र शासनाकडून होणारा लसपुरवठा कमी असल्याने अनेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. लस उपलब्धतेनुसार काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने लस खरेदी करण्याचा निर्णय घेत जागतिक निविदा काढल्या होत्या, मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हेही नियोजन कोलमडले होते. त्यात शासनाकडून लस मिळत नसल्याने लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप वाढत आहे. पालिका प्रशासनाने आता लस पुरवठादार डॉ. रेड्डीज यांच्याकडून स्पुटनिक ही लस जशी उपलब्ध होईल तशी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची पुरवठादाराबरोबर चर्चा झाली असून आठवडाभरात सुमारे दहा हजार लस कुप्या पालिकेला मिळणार असल्याचे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले. ही लस प्राधान्याने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना जाणार आहे. स्पुटनिक लशींच्या दोन मात्रेसाठी पालिकेला 1800 ते 1900 रुपये मोजावे लागणार असून नागरिकांना ती मोफत देण्यात येणार आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू
पालिकेने स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र शहरातील काही खासगी रुग्णालयांनीही स्पुटनिक लस खरेदी केली असून तिचे लसीकरण सुरू केले आहे. नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी रुग्णालय व रिसर्च सेंटर येथे 75 नागरिकांना गुरुवारी ही लस देण्यात आली. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येथे लसीकरण सुरू राहणार आहे. एका मात्रेसाठी 1145 रुपये घेतले जात आहेत. नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील विद्यार्थी, डॉक्टर व कर्मचार्यांनाही स्पुटनिक लसीकरण करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेने डॉ. रेड्डीज या स्पुटनिक लसच्या लसपुरवठादाराकडून लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून प्राप्त होणारी लसींबरोबर स्पुटनिक लस खरेदी करून ज्येष्ठ नागरिकांना देण्याचे नियोजन आहे. पुढील काही दिवसांत 10 हजार स्पुटनिक लस कुप्या प्राप्त होतील.
-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका