Monday , February 6 2023

मोहोपाड्यात रिक्षावर झाड कोसळले; चालकासह प्रवासी जखमी

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातून दांडफाट्याच्या दिशेने निघालेला कंटेनर शुक्रवारी (दि. 9) सकाळी मोहोपाडानजीक आला. या वेळी रस्त्यालगतच्या भल्यामोठ्या वृक्षाच्या फांदीला कंटेनरचा डावा भाग लागल्याने फांदीचा काही भाग खाली कोसळला. याचवेळी बारापाडाहून मोहोपाडा शहराकडे निघालेल्या तीन आसनी रिक्षावर (एमएच-46 बिडी-6899) वृक्षाच्या  फांद्या खाली कोसळल्या. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक केतन कृष्णा पाटील (वय 35) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून खांद्यालाही दुखापत झाली आहे, तर रिक्षातील दोन प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना ताबडतोब उपचारार्थ हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. भलामोठा वृक्ष रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली.जवळपास पराडे कॉर्नर ते चांभार्ली अशी वाहनांची रांग लागल्याचे दिसून आले. रस्त्यावरील भलामोठा वृक्ष बाजूला करण्यासाठी रसायनी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले. रसायनी पोलीस, वाहतूक पोलीस व वासांबे मोहोपाडा कर्मचारी यांनी वृक्षाच्या फांद्या तोडून रस्त्यापासून बाजूला केल्या. दरम्यान, पराडे ते रिस या रस्त्याच्या दुतर्फा जुनाट वृक्ष असून या वृक्षाच्या फांद्या रस्त्याच्या मधोमध झुकल्याने अपघात होत आहेत. शिवाय या रस्त्यावरून मोठे ट्रेलर, कंटेनर, टायर भरलेले उंच मालाचे ट्रक जात असतात. तसेच पराडे दांडफाटा या रस्त्याला पर्यायी रस्ताही नाही. या रस्त्यालगतच्या फांद्या तोडाव्यात यासाठी अनेकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अर्ज केले आहेत, परंतु सार्वजनिक बांधकाम खाते जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply