Monday , February 6 2023

हरलीन भारताची ‘सुपरवूमन’

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टिपला अफलातून झेल

लंडन ः वृत्तसंस्था
भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघांत सुरू असलेल्या टी-20 मालिकेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडू हरलीन देओलने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा अद्भुत नमुना पेश केला. हरलीनने टिपलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात 19व्या षटकात इंग्लंडची स्थिती 4 बाद 166 अशी भक्कम होती. अ‍ॅमी जोन्स ही इंग्लंडची फलंदाज 26 चेंडूंत 43 धावा फटकावून भारतीय गोलंदाजीची पिसे काढण्याच्या तयारीत होती. समोर शिखा पांडे गोलंदाजी करीत होती. षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोन्सने शिखाला उत्तुंग षटकार खेचण्याच्या इराद्याने सीमारेषेच्या दिशेने फटका खेळला. चेंडू बराच उंच गेल्यानंतर सीमारेषेजवळ खाली आला. तिथे क्षेत्ररक्षण करीत होती हरलीन देओल.
षटकार मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या इंग्लंडच्या चमूला हरलीनने जोरदार झटका दिला. सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षणच नाही तर उत्कृष्ट झेल टिपण्याचे कसबही हरलीनने दाखवले. सीमारेषेच्या आत तिने अप्रतिम झेल घेतला, पण तोल जाऊन सीमारेषेबाहेर जातोय हे लक्षात येताच चेंडू हवेत फेकला. त्यानंतर सीमारेषेबाहेर जाऊन पुन्हा डाइव्ह मारत दुसर्‍यांदा अप्रतिम झेल टिपला. या झेलचे कौतुक होत आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply