खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी!
पनवेल : वार्ताहर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भगतवाडी, चिपळे-नेरे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत आवाज उठवल्यानंतर येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र हे खड्डे बुजवणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भारी असेच म्हणावे लागेल. खड्ड्यामध्ये टाकलेली खडी वर आली आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका उद्भवू शकतो.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणार्या माथेरान रोडची अवस्था दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत. भगतवाडी येथे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते, तर चिपळे-विहीघर, नेरे येथील रस्त्यांना खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर या खड्ड्यांमध्ये दगडाची कपची (खडी) टाकण्यात आली, मात्र ही कपची वर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मोजकेच खड्डे बुजविण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खडी वर आल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. ठेकेदाराने व्यवस्थित खड्डे भरायला हवे होते, मात्र ते व्यवस्थित न भरल्याने रोगापेक्षा इलाज भारी झाला आहे.