Breaking News

‘मला तळोजा जेलमध्ये हलवा’

घोटाळेबाज विवेक पाटील यांची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी
मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम सत्र न्यायालयाने आता 22 जुलैपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे तसेच ‘आपल्याला तळोजा जेलमध्ये हलवावे’, या विवेक पाटील यांच्या मागणीवर 22 जुलैच्या सुनावणीत विचार करू, असेही सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 12 जुलै रोजी पूर्ण होत असल्याने त्यांना सोमवारी (दि. 12) न्यायालयात हजर करण्यात आले होते. सक्तवसुली संचालनालातर्फे (ईडी) सुनील गोन्साल्विस, तर विवेक पाटील यांच्यातर्फे हृषिकेश मुंदरगी बाजू मांडत होते.
या सुनावणीत विवेक पाटील यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यापैकी विवेक पाटील यांची रक्त तपासणी करावी, या मागणीवर न्यायालयाने जेलमधील डॉक्टरांना निर्देश दिले की, विवेक पाटील यांची रक्त तपासणी करून त्याचा तपासणी अहवाल न्यायालयाला सादर करावा.
आपले वय 70 वर्षे असल्याने न्यायालयाने या पुढील सुनावणी ‘व्हिडीओ’मार्फत घ्यावी ही विवेक पाटील यांची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे, मात्र ‘ऑर्थर रोड जेलऐवजी आता माझ्या घरावळील तळोजा जेलमध्ये मला हलवावे,’ या त्यांच्या मागणीवर न्यायालयाने येत्या 22 तारखेच्या सुनावणीत निर्णय देऊ, असे म्हटले आहे.
जेलऐवजी रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू
कर्नाळा बँकेतील 543 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्यात अडकलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना सहजासहजी जामीन मिळणे कठीण आहे. त्यामुळे वय आणि आजारपणाच्या मुद्द्यावर ऑर्थर रोड जेलऐवजी तळोजा जेलची मागणी करायची आणि आरोग्य तपासणी करून त्यानंतर स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घ्यायचे या दृष्टीने विवेक पाटील प्रयत्न करीत आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply