Breaking News

‘कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल’

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोकण विभागात कृषी पर्यटनाला मोठी संधी असून 40 कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ती पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्या माध्यमातून कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असे कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालनालयाच्या अधिनस्त असलेले उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत उपसंचालक (पर्यटन) हनुमंत हेडे, उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल डी. एन. राठोड, निसर्ग हॉस्पिटॅलिटीचे संचालक संजय नाईक, तसेच पत्रकार उपस्थित होते.

या वेळी 2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान फणसाड, कर्नाळा अभयारण्य जंगल ट्रेल लिफलेटचे प्रकाशन करण्यात आले. कोकण विभागातील कृषी उद्योजक, हॉटेल, रिसॉर्ट उद्योजक यांना पर्यटन संचालनालयाकडे असलेल्या योजनांचा फायदा घेऊन पर्यटन व्यवसायात एक उत्साहाचे वातारण निर्माण करण्यासाठी, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यटन संचालनालय प्रादेशिक पर्यटन कार्यालय कोकण विभाग यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फणसाड वन्यजीव अभयारण्य व कर्नाळा पक्षी अभयारण्याची जंगल ट्रेल अशी एकदिवशीय सहल 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. निसर्ग हॉस्पिटॅलिटीचे संचालक संजय नाईक हे या सहलीचे आयोजन करणार आहेत.

कोकणातील समुद्र किनार्‍यालगत शासकीय व खाजगी जमिनीवर आरामखुर्च्या आणि मोठ्या छत्र्यांसह तात्पुरत्या हंगामी चौपाटी कुट्या (बीच शॅक), सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्र उभारण्यासाठीचे बीच पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटन विकास अधिक सक्षम व्हावा म्हणून पर्यटन विभागांतर्गत पर्यटन संचालनालयाची निर्मिती करण्यात आली असून एप्रिल 2019 पासून राज्यातील प्रत्येक महसुली विभागात प्रादेशिक कार्यालय उभारण्यात आले आहे. कोकण विभागाचे प्रादेशिक कार्यालय कोकण भवन सातवा मजला सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी नुकतेच कार्यरत झाले आहे. या विभागात कोकणातील सात जिल्ह्यांचे समायोजन करण्यात आले आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply