Breaking News

महाडमधील अडीच हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

महाड : प्रतिनिधी

तालुक्याचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, या वर्षी अकरावी प्रवेशासाठी जागा कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, अनेकांना  प्रवेशासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दरम्यान, पालकांनी लवकरात लवकर मुलांसाठी प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी केले आहे.

दहावीच्या परीक्षेत या वर्षी महाड तालुक्यातील  सर्वच्यासर्व म्हणजे 2438 विद्यार्थी पास झाले आहेत. ते सर्व आता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहेत. महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये आकरावीच्या शास्त्र विभागासाठी 480 जागांपैकी 120 अनुदानित, वाणिज्य विभागासाठी 360 जागांपैकी 120 अनुदानित, कला विभागासाठी 240 अनुदानित जागा तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी 50 अनुदानित जागा आहेत.

महाड तालुक्यात हिरवळ एज्युकेशन ज्युनिअर कॉलेज, सेंट झेवीअर ज्युनिअर कॉलेज, श्री छत्रपती माध्यमिक विद्या मंदिर -मुमुरशी, गोपीनाथ मुंडे ज्युनिअर कॉलेज, सी. जी. मेहता ज्युनिअर कॉलेज, अंजुमन इस्लाम ज्युनिअर कॉलेज, एच. के. देशमुख ज्युनिअर कॉलेज – तुडील, संस्कारधाम माध्यमिक विद्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज ज्युनिअर कॉलेज -वरंध, विद्यावर्धिनी ज्युनिअर कॉलेज – पोलादपूर, आयटीआय कॉलेज – महाड, एम. एम. जगताप कॉलेज, एस. एम. ज्युनिअर कॉलेज – पोलादपूर या तेरा ज्युनिअर कॉलेजमध्येदेखील अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ -लोणेरे आणि कोकण कृषी विद्यापीठ -नांदगाव, कोकरे या ठिकाणीदेखील प्रवेश घेता येणार आहे. मात्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या पाहता या उपलब्ध कॉलेजमधील प्रवेश मिळण्याच्या जागांची संख्या कमी आहे.

वेळ पडल्यास वर्ग संख्या वाढवू मात्र एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहणार नाही. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम जलत गतीने पुर्ण करुन या ठिकाणीदेखील वर्ग सुरू केले जातील.  पालकांनीदेखील जागरुक होऊन प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्यावा

-डॉ. धनाजी गुरव, प्राचार्य,डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply