Breaking News

उपासमारीने महाडमध्ये मगरीचा मृत्यू?

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील कोल गावाजवळ बुधवारी (दि. 13) दुपारी पाण्याच्या डबक्यात एक मगर मृतावस्थेत आढळली. नदी आणि साचलेले पाणी कमी होऊ लागल्याने आणि याठिकाणी खाण्याचे स्रोत कमी झाल्याने भूकबळीमुळे या मगरीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. मात्र कोणत्यातरी अज्ञात कारणाने किंवा नैसर्गिक कारणास्तव गेल्या दोन वर्षात जवळपास सात मगरींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मगरींच्या मृत्युचे गुढ वाढले आहे.

महाड परिसरात सन 2005 मध्ये आलेल्या पुरानंतर सावित्री नदीपात्रात अचानक मगरींचा वावर दिसू लागला. त्या जरी खार्‍या पाण्यातील असल्या तरी सावित्री पात्रात अन्न मुबलक असल्याने या मगरी या परिसरातच वास्तव्य करुन राहिल्या आहेत. केंबुर्ली, महाड, खाडीपट्टा आदी ठिकाणी मगरी दिसून येतात. पावसाळ्यात या मगरी अंडी देण्यासाठी गांधारी व काळ नदीच्या वरच्या पात्रात जातात. तर उन्हाळ्यात सावित्रीच्या पात्रात वावरतात. अन्नाच्या शोधात अलिकडे या मगरी बाहेर पडू लागल्या असून, नदीपात्रात आणि शेजारील डबक्यात या मगरींना अन्न मिळणे बंद झाल्याने मगरींच्या मृत्यूची संख्या वाढली आहे, असा वन खात्याचा प्राथमिक अंदाज आहे.  बुधवारी कोल गावाजवळ सापडलेली मगर जवळपास सात फुट लांब होती. महाड वन विभागाने या मृत मगरीला ताब्यात घेतले असून या मगरीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

अन्नाच्या शोधात मगरी बाहेर पडत आहेत. मात्र नदीपात्र आणि शेजारील साचलेल्या पाण्यात अन्न मिळणे कठीण झाले आहे. शिवाय आता पाण्याची पातळीदेखील घटली आहे, यामुळे मगरी मृत पावत आहेत.

-पी. डी. जाधव, वन विभाग, महाड

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply