कर्जत : बातमीदार
गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी भागात सोमवारी (दि. 19) एक दरड कोसळली. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता वाहतुकीस बंद झाला होता, मात्र स्थानिक आणि टॅक्सी चालकांनी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात या घाटरस्त्यावर दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. माथेरानच्या डोंगरात मागील 24 तासात 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माथेरानच्या डोंगरातील दगड आणि माती पावसाचे पाण्याबरोबर खाली येत आहे. जुम्मापट्टी भागात सोमवारी दुपारी रेल्वे मार्गाच्या अलीकडे असलेल्या डोंगरातील माती, दगड खाली आल्याने नेरळ-माथेरान घाटरस्ता बंद झाला. नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने स्थानिकांच्या मदतीने ही दरड रस्त्यातून बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे. संपूर्ण दरड बाजूला करणे शक्य नाही, त्यामुळे अडकलेली वाहने नेरळ किंवा माथेरानकडे जाऊ शकतील एवढा रस्ता मोकळा करण्याचे काम टॅक्सी चालक करीत आहेत.