खोपोली ः प्रतिनिधी
मागील आठवड्यात खोपोलीतील एक डॉक्टर व त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळली असताना बुधवारी खोपोलीत अजून एक कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. येथील काटरंग भागातील तरुण नोकरीसाठी पळस्पे फाटा येथे दररोज ये-जा करीत होता. त्याला कोरोनासदृश लक्षणे आढळल्यावर त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खोपोलीत तीन कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे खोपोलीकरांची चिंता वाढली.
सुरुवातीला प्रशासनाकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने खोपोली शहर कोरोनामुक्त होते, मात्र मागील आठवड्यात दोन व आता एक असे तीन
कोरोनाबाधित रुग्ण खोपोलीत आहेत. बुधवारी कोरोना झालेल्या तरुणास पालिका आरोग्य विभागाकडून तातडीने पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले. नगरपालिकेकडून त्याच्या थेट संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी सांगितले आहे.