मुंबई : प्रतिनिधी
महाडच्या तळीये गावात दरड कोसळून तब्बल 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर शनिवारी (दि. 24) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी खोचक टीका केली आहे.
राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर चिपळूण, कोल्हापूर, सांगली, महाडच्या दौर्यावर गेले आहेत. या दौर्यावर जाण्यापूर्वी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाड दौर्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांचा महाडचा दौरा म्हणजे या सरकारचे वराती मागून घोडे आहेत. सरकारने आता तरी जागे व्हावे. सरकारची बेफिकीरी हा चिंतेचा विषय आहे. लोकांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असून त्यांचे स्थलांतर करणेही गरजेचे आहे, असे दरेकर म्हणाले.
तळीये येथे दुर्घटना घडल्यानंतर मी आणि पत्रकार प्रतिनिधी सर्वांत आधी तिथे पोहचलो, पण शासनाचा एकही प्रतिनिधी घटनास्थळी आला नव्हता. सरकार इतके निष्क्रिय कसे राहू शकते, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस दौरा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कोविड काळात जी दरी होती, ती आता नाहीये. केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करत आहेत. हेलिकॉप्टर सोडण्यात आले आहे. केंद्राकडून राज्याला पाहिजे ती मदत दिली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून स्वत: पूर आणि दरडग्रस्त भागांचा दौरा करणार आहे. यंत्रणा सक्रिय व्हाव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे. लोकांचे जीव वाचले पाहिजेत, हाच आमचा हेतू आहे, असे ते म्हणाले.
तर सरकारला जाग आली नसती
सातार्याच्या आंबेघरमध्ये मदत न पोहचणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. मंत्र्यांनी आंबेघरला गेले पाहिजे. यंत्रणांना कामाला लावले पाहिजे. आम्ही तिथे पोहचलो नसतो तर या झोपलेल्या सरकारला जागही आली नसती, अशी टीकाही त्यांनी केली.