Breaking News

शेकाप आता भांडवलदारांचा पक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर सभेत वाभाडे

पेण : प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्ष हा शेतकर्‍यांचा राहिलेला नसून आता भांडवलदारांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे शेकापने आपले नाव बदलून भांडवलदार कामगार पक्ष ठेवावे, असा सणसणीत टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 18) लगावला. ते महायुतीच्या पेण येथील जाहीर सभेत बोलत होते.

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ पेणच्या मंथन हॉटेलशेजारी असलेल्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची विराट सभा झाली. या वेळी त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या कारभाराचे जाहीर सभेत वाभाडे काढले.

या सभेस महायुतीचे उमेदवार ना. अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आदी नेतेगण उपस्थित होते.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, गीते साहेब सुनील तटकरे यांना आपण घाबरण्याचे कारण नाही, कारण जे तटकरेंनी केले आपण ते करू शकत नाही. आपण सदाचारी आहात व तटकरे भ्रष्टाचारी आहेत. आज शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीच्या माध्यमातून आपण उभे आहात. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या नीतीने आपण नेहमीच काम करीत आलेला आहात. त्यामुळे जनता आपल्याला नक्कीच 23 तारखेला मतपेटीतून भरभरून मत देईल.

जनतेला उद्देशून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक कोणत्या गल्लीची नसून दिल्लीची निवडणूक आहे. आपण विचार करूनच मतदान करा. युतीच्या उमेदवाराला निवडून आणा. आपल्यालाच फैसला करायचा आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना मत द्यायचे की ज्यांनी देशाचे परिवर्तन केले त्यांना.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी माढा मतदारसंघ निवडला व ते मैदानावर खेळायला आले. सलामीच्या फलंदाजाने पॅड घातले, हेल्मेट घातले व क्रिकेटची बॅट हातात घेतली, मात्र अचानक मैदान सोडून त्यांनी यू-र्टन घेतला आणि मी आता बारावा गडी (राखीव) म्हणून घोषणा केली. अहो तटकरे, तुमचा कॅप्टनच खेळत नसेल, तर तुम किस खेत की मुली हो. भ्रष्टाचार करायचा व सत्ता मिळवायची हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक समीकरणच झालेले आहे. त्यांनी संपूर्ण देशात महाआघाडीच्या नावाखाली महाखिचडी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. पणजोबा पंतप्रधान, आजी पंतप्रधान, वडील पंतप्रधान तरी यांना गरिबी हटविता आली नाही. काँग्रेसने गेल्या 60 वर्षांत गरिबी हटवण्याच्या नुसत्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात गरिबी हटलेली नाही. त्यामुळे राहुलबाबा नक्की काय खाऊन गरिबी हटवणार, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. राहुल गांधींची घोषणा फसवी असून, देशाची जनता त्याला बळी पडणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

आपल्या तडाखेबाज भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या मुद्द्यावर जास्त भर दिला. रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण असो किंवा इतर रस्त्याची कामे ही वेगाने सुरू असून, येत्या काही काळात जलवाहतुकीने मुंबईशी रायगडची कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे. इथला शेतकरी, कामगार, मच्छीमार या सर्वांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासक योजना सुरू केल्यात. शेतकर्‍यांच्या भाताला हमीभावासहित 500 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय असो किंवा शेतकर्‍यांच्या खारभूमीचे प्रश्न सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतल्याने भ्रष्टाचाराला कुठेच थारा मिळालेला नाही. मच्छीमारांना कृषी कर्जाप्रमाणेच बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती पंतप्रधानांनी केलेली आहे. शेतकरी, कामगार व इतर समाज घटकांना सोबत घेऊन देशाच्या प्रगतीचे, विकासाचे एक सुंदर संकल्पचित्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत उभे राहिलेले आहे.

रायगड जिल्ह्याच्या विशेषतः पेणच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एमएमआरडीएमध्ये संपूर्ण पेण तालुक्याचा समावेश झाल्याने पेणच्या विकासासाठी आगामी कालखंडात 10 हजार कोटी बजेट असलेले इन्फ्रास्ट्रक्चर तथा विकासात्मक कामे सुरू होणार असून, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बेरोजगारी मिटविण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल टाऊनशीपची उभारणी केली आहे व त्यामुळेच लवकरात लवकर येथील 10 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे, तसेच पेण शहरातील माणूस सहजगत्या मुंबई शहराशी संपर्कात येऊन येथील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. पेण खारेपाटातील 30 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचा निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे.

लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराविरोधात असून, सबका साथ सबका विकास हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घोषवाक्य असल्याने देशातील जनता मोदींच्या प्रखर राष्ट्रवादामागे उभी राहिलेली आहे. जनतेमध्ये मोदींबद्दल आपुलकीची भावना असल्याचे चित्र दिसत असल्याने विरोधकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदीच दिसत आहेत. उठसूठ पंतप्रधानांवर टीका करणार्‍यांना स्वप्नातसुद्धा मोदीच दिसताहेत. अनंत गीते हे स्वच्छ, प्रामाणिक व निष्कलंक उमेदवार असल्याने शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे बटण दाबून गीतेंना भरघोस मतांनी विजयी करा आणि विजयाचे ते शिवधनुष्य नरेंद्र मोदींच्या हातात द्या, मग बघा या भ्रष्टाचार्‍यांना पळता भुई थोडी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

मनसेवर टीका करताना बंद पडलेले इंजिन कोणी कोणी भाड्याने घेतले, पण त्याचा जनतेवर कोणताच प्रभाव पडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंबाबत बोलताना सांगितले.

महायुतीचे उमेदवार अनंत गीते आपल्या भाषणात म्हणाले की, सुनील तटकरे यांना मी महत्त्व देत नाही. माझ्या द़ृष्टीने ते नगण्य आहेत. रायगडच्या जनतेने माझ्यावर मनापासून प्रेम केले आहे. सातव्यांदासुद्धा ही जनता माझ्या पाठीशी ठाम उभी राहिलेली असल्याने माझा विजय निश्चित असून, लाख ते दीड लाख मतांनी विजयी होईन, असा मला विश्वास आहे. युतीचा नवा अध्याय राष्ट्रहिताकरिता सुरू झाला असून, त्यात मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री रवीशेठ पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड यांचीही समयोचित भाषणे झाली. या सभेस भाजप विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील, प्रवक्ते मिलिंद पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, जि. प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगडचा विकास करायचाय : ना. चव्हाण या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, रायगड जिल्ह्यात व पेण तालुक्यात अनेक ओसाड गावे आहेत, परंतु आपल्याला या सर्व भागाचा विकास करायचा आहे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊ या. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशहितासाठी कार्यरत आहेत. त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी युतीचे उमेदवार अनंत गीते यांना आपल्याला संसदेत पाठवायचे आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply