Tuesday , February 7 2023

पनवेलमध्ये पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पाहणी; आमदार प्रशांत ठाकूर, मनपा आयुक्तांची उपस्थिती; महापालिका प्रशासनाकडून आमदारांच्या मार्गदर्शक सूचनांचा स्वीकार

गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबतही आयुक्त सकारात्मक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यावर पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते. जास्त पाऊस झाल्यास शहरालासुद्धा पुराची भीती अनेकदा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 27) पाहणी दौरा करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सूचनांचा महापालिका प्रशासनाने स्वीकार केला. याशिवाय गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पनवेल शहरात पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ‘ब’वर भराव घालून त्या ठिकाणी पूल बांधण्यात आला. तेव्हापासून पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने पनवेल शहरातील खाडीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होते. जास्त पाऊस झाल्यानंतर बावन बंगला, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी, लोखंडी पाडा साईनगर, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल, पटेल व कच्छी मोहल्ला, भारत नगर जुने कोर्ट याव्यतिरिक्त कोळीवाडा या ठिकाणी पाणी साचते. विशेषकरून प्रभाग क्रमांक 14, 18 आणि 19 हा परिसर जलमय होतो. त्यामध्ये खांदा गावाचाही समावेश आहे. मागील आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे या परिसरात पाणीच पाणी झाले होते. काही घरांमध्येही हे पाणी जाऊन नुकसान झाले. वडघर येथे सिडकोने रिटेनिंग वॉल बांधली असल्याने त्याचा परिणामसुद्धा या ठिकाणी होतो. माथेरानच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेकदा गाढी नदी पात्र भरून वाहते. त्यामधून पाणी पनवेल शहरातील विविध भागांमध्ये शिरत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. या सर्व गोष्टींचा विचार करून पनवेल महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि योग्य ते नियोजन करावे अशा प्रकारची सूचनावजा मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पाहणी दौर्‍याचे आयोजन केले होते. या वेळी माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे, तसेच अतुल पाटील, शहर अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंखे, मुनोत, अनिल कोकणे, आदेश कोठारी, गगन सिंग, रूपारेल, राजेश आचार्य, पुरोहित, नरेश म्हात्रे हेही उपस्थित होते. पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याच्या मागणीला या वेळी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी तत्त्वतः मान्यता दिली. त्याचबरोबर इतर उपायोजना करण्याचेही त्यांनी मान्य केले.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply