Breaking News

पूरग्रस्तांना एक कोटींची मदत द्या

आमदार मंदा म्हात्रेंची नवी मुंबई महापालिकेकडे मागणी; आयुक्तांसोबत बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी

आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध विषयांसंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. राज्यातील पूरग्रस्तांना पालिकेमार्फत एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी या वेळी त्यांनी केली. आयुक्तांनीही प्रतिसाद देत लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहचणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

बैठकीदरम्यान सीवूड्स सेक्टर 50 येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भूखंड हस्तांतरित करणे, नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे करणे, मोडकळीस आलेल्या इमारती व डोंगराळ भागातील रहिवाशांच्या घरांची व्यवस्था करणे, आमदार निधीतून शूटिंग रेंज प्रशिक्षण केंद्र, कुस्ती आखाडा उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे कोकणाला अक्षरशः झोडपून काढले. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता केंद्र व राज्य सरकारसहित विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही मदतीचा ओघ सुरू आहे. नवी मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका म्हणून गणली जात असताना अशा संकटातून त्यांना सावरणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. महापालिकेमार्फत एक कोटी रुपयांचा निधी, तसेच अन्नधान्य, कपडे, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यास या संकटातून बाहेर येण्यास त्यांना मदत होईल व पूरग्रस्त कोकणवासीयांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळेल.

मी माझे एक महिन्याचे वेतनही पूरग्रस्तांना देणार असून सर्वांनीच पूरग्रस्तांना मदत म्हणून हातभार लावावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply