टोकियो ः वृत्तसंस्था
विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत 12व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा 40 मिनिटांमध्ये 21-15, 21-13 अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे आता सिंधू पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे. या विजयामुळे सिंधूची मियाविरुद्धची आतापर्यंतच्या सामन्यांमधील सिंधूची कामगिरी 5-1 अशी झालीय. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकले आहेत. सिंधूने या सामन्यात मियाच्या विरुद्ध खेळताना चांगली सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये काही वेळ सिंधू 11-6ने आघाडीवर होती. त्यानंतर स्कोअर 13-10 झाला. त्यानंतर 16-12 असा स्कोअर झाला, मात्र मियाने दमदार कमबॅक केल्याने सामना 16-15 पर्यंत आला. नंतर सिंधूने सामन्यावरील पकड मजबूत करीत लागोपाठ पाच पॉइंट जिंकत पहिला सेट 21-15च्या फरकाने आपल्या नावावर केला. पहिला सेटमध्ये 22 मिनिटांचा खेळ झाला. दुसर्या सेटमध्येही सिंधूने चांगली सुरुवात केली आणि 5-0ची आघाडी मिळवली. त्यानंतर मियाने चांगला खेळ करीत स्कोअर 3-6पर्यंत आणला, मात्र हाफ टाइमपर्यंत सिंधूने 11-6च्या फरकाने आघाडी घेतली होती. शेवटी तिने 21-13च्या फरकाने दुसरा सेटही जिंकला. हा सेट 19 मिनिटे चालला. आता सिंधू महिला बॅडमिंटच्या एकेरी स्पर्धेत अंतिम आठ खेळाडूंमध्ये आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध होण्याची शक्यता आहे.