Breaking News

भारतीय महिला हॉकी संघाने आयर्लंडला नमविले

टोकियो : वृत्तसंस्था

भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पूल-ए मधील सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना गोल नोंदवत बाजी मारली आणि 1-0ने बाजी मारत अंतिम-8 मध्ये स्थान पक्के केले. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध गोल करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत राहिले. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण गोल करण्यात भारतीय महिला खेळाडू अपयशी ठरल्या. पहिल्या हाफमध्ये भारताला 10 पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकही गोल करता आला नाही. दुसर्‍या हाफच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले, पण तरीही सामन्यातील पहिल्या गोलची प्रतीक्षा होतीच. भारतीय संघाने 17 वेळा आयर्लंडच्या सर्कलवर हल्ला केला आणि 14 पेनल्टी कॉर्नरही मिळविले, पण तिसर्‍या क्वार्टरपर्यंत गोल नोंदवता आला नाही. आतापर्यंतचे सर्व सामने गमावलेल्या भारतीय हॉकी संघासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. जर भारतीय संघाने हा सामना बरोबरीत सोडला असता किंवा गमावला असता, तर उपांत्यपूर्व फेरीचे सर्व दरवाजे बंद झाले असते. भारतीय खेळाडूंनी बराच वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते, पण अनेक प्रयत्नानंतरही गोल होत नव्हता. सामना संपण्यास 3 मिनिटे शिल्लक असताना नवनीत कौरला आयर्लंडचं गोलपोस्ट भेदण्यात यश आलं आणि भारताच्या आशा पल्लवित झाल्या. भारताने हा सामना 1-0ने जिंकला. हा भारतीय महिला संघाचा टोकियो ऑलिम्पिकमधील पहिला विजय ठरला. विश्वचषक उपविजेत्या असलेल्या आयर्लंडविरुद्धच्या या विजयामुळे तीन पराभवांचे ओझे थोडे कमी झाले आहे. या विजयासह भारताने ऑलिम्पिकमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. शनिवारी (31 जुलै) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि आयर्लंडचा संघ ग्रेट ब्रिटनकडून पराभूत झाला, तर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल. 

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply