माणगाव : प्रतिनिधी : तटकरेंच्या घरात चार आमदार व एक जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही ज्यांना रायगड जिल्ह्याचे नंदनवन करता आले नाही, त्यांनी गीतेंवर टीका करू नये. आपल्याला तटकरेंना मुळासकट उपटून टाकायचे आहे. अनंत गीते त्यांची वाट लावणारच आहेत, पण येणार्या काळात तटकरे कुटुंबाला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करू, असे जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे बुधवारी (दि. 3) जाहीर सभा घेण्यात आली. गीते यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत रवी मुंढे बोलत होते. सदाचारी व निष्कलंक गीते पुन्हा रायगडचा खासदार म्हणून निवडून जाणार, यात शंका नाही, असा विश्वास मुंढे यांनी या वेळी व्यक्त केला.
देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची सत्ता येणार असून, राज्यात महायुतीला उत्साही व अनुकूल वातावरण आहे. मागची निवडणूक माझ्यासाठी अटीतटीची व चुरशीची होती. या वेळेस मैदान मोकळे असून, माझा कुणी प्रतिस्पर्धी राहिला नाही. माझा विजय निश्चित आहे, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांनी या वेळी दिली.
शिवसेनेच्या संपर्कप्रमुख सुवर्णा करंजे यांनीही सुनील तटकरेंवर टीका करीत स्वच्छ प्रतिमेचे अनंत गीते यांना विजयी करा, असे अवाहन केले. या वेळी शिवसेना नेते राजीव साबळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, माणगाव तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे, राजिपचे माजी उपाध्यक्ष संजीव जोशी, तालुका समन्वय समिती अध्यक्ष नाना महाले, बळीराम घाग यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॅ. अंतुले साहेबांनी काँगे्रसला पुनर्जन्म दिला. त्यांचे सुपुत्र नाविद अंतुले शिवसेनेत आल्यामुळे आज व्यासपीठावर अंतुले साहेबच उपस्थित असल्याचे वाटत आहे. नाविद अंतुलेंचा शिवसेना प्रवेश हा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे.
-अनंत गीते, महायुती उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघ
अनंत गीते हे सदाचारी व्यक्तिमत्त्व असून ते निवडणूक जिंकल्यात जमा आहेत. विश्वासघातकी तटकरे हे त्यांचे प्रतिस्पर्धी कधीच होऊ शकत नाहीत. तटकरेंना विरोध करणार्या श्रीवर्धन व म्हसळ्यातील काँगे्रसला धन्यवाद देतो.
-नाविद अंतुले, शिवसेना नेते
माणगावात महायुतीचे जनसंपर्क कार्यालय
माणगाव : शहरातील विठ्ठल शिंदे यांच्या इमारतीत महायुतीचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उमेदवार अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख रवी मुंढे, नाविद अंतुले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, नगरसेवक नितीन बामगुडे, संजयअप्पा ढवळे, नाना महाले, अजित तार्लेकर, सुनील पवार, साधना पवार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मोर्बा येथील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे अनंत गीते व आमदार भरत गोगावले यांनी स्वागत केले.