माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते जपत कुठल्याही प्रसंगात लोकांना मदत करण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आले आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने ते देवदूताची भूमिका पार पाडत आहेत. त्यांचा वाढदिवस 2 जून रोजी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा… मातोश्री भागूबाई, पिताश्री चांगू ठाकूर व सासरे जनार्दन भगतसाहेबांचे आशीर्वाद लोकनेते रामशेठ ठाकूर यांना लाभले. प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीशक्ती असते ती शक्ती त्यांच्या पत्नी शकुंतला यांनी दिली, तर पुढील कार्याला साथ लाभली ती आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर या सुपुत्रांची. शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन ते नेहमी कार्यरत राहिले असून त्यांचा माणसांवर अधिक विश्वास आहे. माणुसकी व कर्तव्याची जाण ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या जवळ असलेली आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे केले आणि आताही करीत आहेत. लोकनियुक्त प्रतिनिधी खासदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या या पदाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात केलेली दर्जेदार विकासकामे आजही लोकांच्या स्मरणात राहिली आहेत. खासदार म्हणून त्यांनी येथील समस्या, प्रश्न संसदेत मांडतानाच रायगडच्या विकासाचा आलेख उंचावला. त्यामुळे आजही विविध गावांतील ज्येष्ठ नागरिकांकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख आवर्जून ऐकायला मिळतो. देशभरातील विद्यालये पनवेल, नवी मुंबईत शिरकाव करीत असताना येथील गोरगरीब विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट शिक्षणाची दालने रामशेठ ठाकूर यांनी उभी करून दिली. आज ज्या संस्थेच्या माध्यमातून गेली 27 वर्षे शिक्षणाचे पवित्र काम केले जात आहे, त्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचे सर्व श्रेय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाचे आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना करून खर्या अर्थाने लाखो लोकांना वैद्यकीय, आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य व शिक्षणासाठी आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशी विविध प्रकारची मदत देत आधार दिला आहे. या मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उलवा नोडमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची स्थापना केली आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी निःशुल्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची दारे खुली केली. सांस्कृतिक ठेवा म्हणून आगरी कोळी आणि आता मल्हार महोत्सव नावाने सुपरिचित झालेल्या महोत्सवाने संपूर्ण रायगड, नवी मुंबईसह राज्यात वाहवा मिळवली. अत्यंत सुंदर नियोजन आयोजनामुळे या महोत्सवाची दरवर्षी उत्सुकता वाढत राहिली. त्याचबरोबर पनवेल मॅरेथॉन, त्यानंतर खारघर नावाने सुरू झालेल्या या स्पर्धेच्या दर्जेदार आयोजनामुळे संपूर्ण परिसरात मॅरेथॉन व त्या अनुषंगाने व्यायामाचे महत्त्व वाढले आणि पनवेलमध्ये सुरू झालेल्या या मॅरेथॉनने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा सुरू केली. गेली 20 वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरू असून राज्यातील सर्वांत मोठी दिवाळी अंक स्पर्धा म्हणून ती सुप्रसिद्ध आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाजकारणाबरोबर शिक्षणाची आवड आहे, त्याचप्रमाणे ते क्रीडा क्षेत्राचीही आवड ठेवतात. त्यामुळे देशातील कबड्डीपट्टूंचा थरार रायगड, नवी मुंबईला अनुभवायला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन त्यांनी सातत्याने करीत खेळ आणि पर्यायाने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आले आहेत. शिक्षण हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आत्मा. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे ही त्यांची तळमळ असते. उच्च शैक्षणिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षणासाठी मदत करण्यात येते. आज ही मदत घेऊन हजारो विद्यार्थी उच्चशिक्षित होऊन कुणी पायलट तर कुणी इंजिनिअर, आर्किटेक्ट होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. रयत शिक्षण संस्था ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मातृसंस्था राहिली आहे. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था असतानाही त्यांनी झुकते माप ‘रयत’ला दिले. आज ते या संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत, पण ते स्वतःला रयतसेवक समजून काम करीत असतात. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांच्या उभारणीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खारीचा नाही, तर सिंहाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यातील विद्यालयांसह महाराष्ट्रातील अनेक शाखांना नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी निस्वार्थीपणे केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचे ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ सातार्यात उभारले जात आहे. हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचाच गौरव नाही, तर पनवेल, उरण, रायगडचा सन्मान आहे. स्थानिक, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या लढ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच अग्रभागी राहून काम केले आहे. दिवंगत दि. बा. पाटील, थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या प्रेरणेने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच सर्व समाजासाठी काम केले. ‘दिबा’साहेबांच्या लढ्यात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. दि. बा. पाटीलसाहेब प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहेत. त्यांनी प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी सर्वस्व अर्पण केले आणि त्याच भावनेतून व आदरातून लोकनेते रामशेठ ठाकूर काम करताना दिसतात. सध्या नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे ही ठाम भूमिका मांडत सातत्याने प्रयत्नशील राहून सर्वपक्षीय कृती समितीची चळवळ वृद्धिंगत केली आहे. काहीही होवो ‘दिबा’साहेबांचेच नाव ही भूमिका घेऊन एल्गार पुकारला आहे. जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आग्रही भूमिका महत्त्वाची ठरली. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी दिवंगत दि. बा. पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांनी सतत ठाम भूमिका मांडली. वेळोवेळी झालेल्या बैठका, मोर्चे, आंदोलनांमध्ये त्यांनी ताकद दाखवून दिली. सिडकोने विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्यानंतर गावांच्या सीमारेषेवर ताबा घेण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी वेळोवेळी होत राहिलेल्या सिडकोच्या सर्वेक्षणाला तसेच बांधकाम तोडणीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कडाडून विरोध केला. गावठाणाच्या चारही बाजूला 200 मीटर जागा गावासाठी सोडण्याचा ठाम आग्रह केला. नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करा, असा आवाज उठवून तशी तरतूद करण्यास शासनाला भाग पाडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्याचबरोबर सिडको हद्दीतील गावांचा विकास झाला पाहिजे यासाठी सिडकोने गावांना विकासनिधी द्यावा हा आग्रह लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धरला आणि त्या माध्यमातून गावांना विकासनिधी मिळत आहे. त्यामुळे गावांच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान मानले जाते. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका कायम राहिली. त्यामुळे न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पात बाधित होणार्या मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची आग्रही मागणी करण्याबरोबरच त्या संदर्भातील पाठपुरावा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केला आणि त्यातून मच्छीमारांना भरपाई मिळाली. महिलावर्गातून छोट्या-मोठ्या उद्योजिका निर्माण व्हाव्यात यासाठी रोजगार प्रशिक्षण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. त्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार सुरू केला तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करून आजपर्यंत हजारो तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अपंगत्वावर मात करण्यासाठी कृत्रिम हात व पाय बसविण्याचे शिबिर अर्थात जयपूर फूट कॅम्पचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून हजारो अपंग व्यक्तींना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले. दरवर्षी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करून सर्वसामान्यांना आरोग्यदायी जीवनाची भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिबिराचा दरवर्षी किमान 15 हजार नागरिक लाभ घेत असतात. त्यामुळे आजपर्यंत लाखो जणांना या उपक्रमाचा लाभ झाला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस. तेसुद्धा ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोडत असले तरी त्यांचे कार्य एवढे अफाट आहे की आजही ते अगदी युवकांच्या एनर्जीप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत स्वतःला झोकून देऊन काम करतात. स्वतःचे वय 70 असले तरी ते कधीही ज्येष्ठ नागरिकांना विसरत नाहीत. कारण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा त्यांच्या हृदयाचा एक कप्पा आहे. महापूर असो वा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच मदतीतून सर्वसामान्यांना आधार दिला आहे. कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करीत देवदूताप्रमाणे त्यांनी प्रामाणिक कार्य केले. त्यामुळे कोरोनाच्या आव्हानात्मक काळातही कोरोनावर मात करण्यासाठी मोलाची भूमिका बजाविणारे सेवाव्रती देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेले कार्य संस्मरणीय आणि अग्रस्थानावर राहिले आहे. कोरोना महामारीमध्ये आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना मागील वर्षात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वखर्चातून दीड लाखाहून अधिक अन्नधान्याचे कीट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वच्छता मोहीम, आर्थिक मदत, याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणपती सण गोड करण्यासाठी 60 हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य अशी हरएक आवश्यक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून झाली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम राबविले जातात, मात्र या वर्षीही कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसले तरी समाजोपयोगी उपक्रम सुरूच राहणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल 72 हजार 847 रेशन कीट वाटप झाले आहेत. राजकारणातून समाजकारण आणि सेवाभावी वृत्ती अंगीकारायला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आणि वाटचाल युवा पिढीसाठी खूप मोलाची ठरणार आहे. त्यामुळे आप जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, अशा शब्दांत वाढदिवसानिमित्त तुम्हा-आम्हा सर्वांचे देवदूत रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-हरेश महादेव साठे