Breaking News

सावित्री नदीपूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी

महाड येथील सावित्री नदी पूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी, जिल्ह्यातील जे पूल वाहतुकीस योग्य नाहीत अशा पुलांवरील वाहतूक ताबडतोब बंद करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी सोमवारी (दि. 2) येथे पत्रकार परिषदेत केली. 2 ऑगस्ट 2016 रोजी सावित्री नदीवरील महाडजवळील पूल कोसळला होता. यात दोन बस आणि एक कार वाहून जाऊन 40 जणांचा मृत्यू झाला. याची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने आपला अहवाल सादर केला असून त्यात कुणालाही दोषी ठरविलेले नाही. सर्व अधिकार्‍यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. ही क्लिन चिट नसून चिटींग क्लिन आहे, असा आरोप डॉ. उदय धुरी यांनी या वेळी केला. हा पूल ब्रिटिशांनी बांधला होता. तो वाहतुकीस अयोग्य असतानाही त्यावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. तेथे कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यात आले नव्हते. पोलिसांची गस्त ठेवण्यात आली नव्हती. अशा गंभीर चूका प्रशासनाकडून झाल्या होत्या. तरीदेखील या प्रकरणाची चौकशी करणार्‍या आयोगाने प्रशासनातील सगळ्या अधिकार्‍यांना आपल्या अहवालात क्लिन चिट दिली आहे हे पटणारे नाही. त्यामुळे या दुर्घटनेची पुन्हा चौकशी करावी आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. धुरी यांनी केली.देशाच्या महालेखापालांनी दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दोन हजार 635 पूल नादुरुस्त आहेत. त्यात रायगड जिल्ह्यातील पुलांचादेखील समावेश आहे. नागोठणे, रोहा, रेवदंडा, खारपाडा या पुलांवर सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. याव्यतिरिक्त असे अनेक पूल आहेत जे वाहतुकीस अयोग्य आहेत. तेथे सावित्री नदीवरी पुलाप्रमाणे दुर्घटना होण्याची भीती आहे. त्यामुळे या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात यावी, अशीही मागणी धुरी यांनी केली. या वेळी सागर चोपदार, विशाखा आठवले उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply