अलिबाग : रामप्रहर वृत्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खोपोली आणि खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे मारून अवैधरित्या विक्रीकरिता आणलेला गुटखा तसेच एक टेम्पो, एक टाटा एस छोटा हत्ती टेम्पो व एक होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल असा एकूण 57,82,100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अलिबाग शहरात एकाच वेळी वेगवेगळया ठिकाणी धाडी टाकून अवैध गुटखा विक्री करणार्या 20 जणांवर कारवाई केली होती. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान खालापूर व खोपोली पोलीस ठाणे हद्दीतदेखील काही इसम मोठया प्रमाणावर अवैध गुटखा विक्रीचा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. याबाबत खात्री करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी सहाय्यक निरीक्षक एस. व्ही. सस्ते त्यांच्या पथकासह 17 आणि 18 एप्रील रोजी खोपोली पोलीस ठाणे हद्दीत शिळफाटा आणि खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील कलोते-मोकाशी (ता. खालापूर) येथील अडड्यांवर छापे टाकले. आणि तेथे अवैधरित्या विक्रीकरिता आणलेला 48,57,100 रुपये किंमतीचा गुटखा तसेच 9लाख 25हजार रूपये किंमतीचा एक टाटा 407 टेम्पो, एक टाटा एस छोटा हत्ती टेम्पो व एक होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल असे मिळून एकूण 57लाख 82हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.