Breaking News

कोतुर्डे धरणातील पाणी आरक्षित करावे

महाड तहसीलदारांकडे ग्रामस्थांची मागणी

महाड : प्रतिनिधी

रायगड विभागात असलेल्या कोतुर्डे धरणातील पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या महाड तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोतुर्डे धरणाचे पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी महाड  तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाड शहरासह तालुक्यातील वाळसुरे, चापगाव, वरंडोली, तळोशी, खर्डी, नांदगाव बुद्रुक, नांदगाव खुर्द, नाते, किंजळोली बुद्रुक, गांधार पाले, साहिल नगर, वहूर, दासगाव, लाडवली, मोहोप्र, आचळोली आदि बावीस गावांना कोतुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणातील पाणी गांधारी नदीमध्येदेखील सोडले जाते. गांधारी नदीतील पाणी जॅकवेलद्वारे अनेक गावांना पुरवले जाते. मात्र गेल्या काही दिवसापासून कोतुर्डे धरण व गांधारी नदीतील पाणी अनधिकृतरित्या रस्त्याच्या कामाकरता वापरले जात असल्याचे दिसून येत आहे, त्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नदीतील पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरणे बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महाड-रायगड रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी दररोज सुमारे एक लाख लिटर पाण्याचा वापर केला जात आहे. अजून सुमारे तीन महिने या पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कोतुर्डे धरण आणि गांधारी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. तसेच गांधारी नदी कोरडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतुर्डे धरणाचे पाणी आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी महाडचे तहसीलदार सुरेश काशिद यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, महाड पं.स.चे माजी सभापती सदानंद मांडवकर, वहूरचे सरपंच जितेंद्र बाईकर, नाते विभागातील विजय सावंत, बंधु तरडे, दासगावचे माजी सरपंच दिलीप उकिरडे यांनी या विषया संदर्भात महाडच्या गटविकास अधिकार्‍यांची भेट घेऊन गांधारी नदीचे पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यास बंदी घालावी. अशी मागणी केली.

महाड-रायगड मार्गाच्या कामासाठी संबंधीत ठेकेदाराने अद्याप जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे गांधारी नदीतून पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल.

-रमेश चितळकर, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग, महाड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply