कर्जत : प्रतिनिधी
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या वतीने तीन दिवशीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचाच भाग म्हणून अभिनव कला प्रदर्शन भरविण्यात आले आहे, कर्जतमधील अनेक चित्रकार व रांगोळीकारांच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या विविध वर्ग खोल्यामध्ये चित्र व कलात्मक रचना या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्याध्यापक दिनकर वायदंडे यांच्या संकल्पनेतून कर्जत परिसरातील कमर्शियल चित्रकार, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी हे दालन विविध कलाकृतीनी सजवले आहे. या कला प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे उदघाटन रांगोळीकार प्रकाश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले तर चित्रकार राजन दगडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. ‘आपले कर्जत‘ चे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश वैद्य, व्यक्तिचित्र रंगावली व संगीत वाद्य दालनाचे उदघाटन अभिनेते राहुल वैद्य, कोलाज हस्तकला टेक्सटाईल आर्ट वर्क दालनाचे उदघाटन चित्रकार सुनिल परदेशी, ग्राफिक व क्रिएटिव्हिटी रचना दालनाचे उदघाटन चित्रकार चंद्रकांत चव्हाण, कमर्शियल चित्रकारांच्या कलाकृती दालनाचे उदघाटन चित्रकार किसन खंडोरी, वरील मजल्यावरील प्रवेशद्वाराचे उदघाटन चित्रकार श्रुती साळोखे तर ‘आम्ही सावित्रीच्या लेकी‘ या विशेष दालनाचे उद्घाटन आंतराष्ट्रीय चित्रकार पराग बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव जनार्दन मोघे, खजिनदार विनायक चितळे, सदस्य चंद्रकांत कुडे, अनुपमा कुळकर्णी, दिनानाथ पुराणिक, रविंद्र खराडे, पद्माकर गांगल आदी उपस्थित होते. नाट्यमहोत्सव प्रमुख विजय मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हे कलादालन साकारण्यासाठी दिनकर वायदंडे, चिंतामण ठाकरे, अनिल गलगले, दया हजारे, कुणाल साळवी, सायली सोनार, संतोष देशमुख, गोपाळ वळवी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली मुसळे यांनी केले तर विजय मोरे यांनी आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक राजाराम गायकवाड, गौळवाडी शाळेचे मुख्याध्यापक सच्चीदानंद जोशी, माजी मुख्याध्यापक कमलाकर वारे, ज्येष्ठ शिक्षिका मंगल गायकवाड, स्मिता भोईर, नंदकुमार मणेर, निवृत्त शिक्षक दिलीप पाटील आदींसह शिक्षक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.