कर्जत : बातमीदार
नेरळमधील काही भागात महापुराचे पाणी घुसले होते. या पाण्यात विद्यार्थ्यांची पुस्तके भिजली. नेरळ व्यापारी फेडरेशनने सामाजिक बांधिलकी दाखवत त्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
मुसळधार पावसामुळे 21 जुलैच्या मध्यरात्री नेरळ गावातील सखल भागात पुराचे पाणी शिरले होते. सर्व लोक झोपेत असताना पाणी शिरल्याने घरातील वस्तू अन्यत्र हलवता आल्या नव्हत्या. त्यात वह्या, पुस्तके भिजून गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही बाब नेरळ व्यापारी फेडरेशनच्या पदाधिकार्यांना सांगण्यात आली. या पदाधिकार्यांनी एकत्र येत पुरामध्ये नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दफ्तर देण्याचा निर्णय घेतला.
नेरळ व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष कमलेश ठक्कर, उपाध्यक्ष निलेश शहा, सचिव जईड नजे, सदस्य सुनील शहा, अनिल जैन, बंडू क्षीरसागर, पवन पटेल यांनी राजेंद्रगुरू नगर भागातील पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप केले.