कर्जत : बातमीदार
माथेरानला आलेले पर्यटक इको पॉईंटवर हमखास जातात. दिवा (जि. ठाणे) येथे राहणारा एक युवक मद्यधुंद अवस्थेत आत्महत्येचा बनाव करत येथील दरीच्या टोकावर जाऊन बसला होता. त्याला रेस्क्यू टीमच्या सहकार्याने पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले व घरी पाठविले.
माथेरानच्या इको आणि किंग एडवर्ड या दोन्ही पॉईंटच्या मधोमध असलेल्या 1500 फूट खोल दरीच्या टोकावर सदर मद्यधुंद युवक जाऊन बसला असल्याचे येथील व्यावसायिक व पर्यटकांच्या निदर्शनास आले. सदर युवकाला समजावून रेलिंगच्या आत येण्याची विनवणी करण्यात आली, मात्र हा तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. येथील व्यावसायिकांनी सदर घटनेची माहिती माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत काळे यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सह्याद्री रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळ गाठले.
माथेरान पोलीस ठाण्याचे शिपाई राहुल पाटील व रेस्क्यू टीमचे संतोष केळगणे यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला समजावत, त्याच्याशी सलोख्याने बोलत दरीच्या टोकावरून सुरक्षा रेलिंगच्या आत घेऊन आले. या वेळी सह्याद्री रेस्क्यू टीमचे सुनील कोळी, चेतन कळंबे, उमेश मोरे, महेश काळे, तसेच रुग्णवाहिका चालक अजिंक्य सुतार यांनी सहकार्य केले.
या युवकाला माथेरान पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हवालदार महेंद्र राठोड, शिपाई राकेश काळे यांनी चौकशी केली असता, या युवकासोबत आणखी आठ मित्र असल्याचे समजले. त्या सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले.
तेदेखील मद्य प्राशन केलेल्या स्थितीत आढळून आले. या युवकाला पॉईंटवर सोडून बाकीचे मित्र इतर पॉईंट फिरण्यासाठी निघून गेले होते. या प्रकरणामुळे पोलीस, तसेच रेस्क्यू टीमची भांबेरी उडाली होती.