नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी, कधी जास्त होत असल्याने तो पूर्ण जाईल की नाही, कधी जाईल? या बाबत निश्चित असे कोणालाही माहित नाही. फक्त कोरोनाला रोखण्यासाठी अथवा नियंत्रणात आणणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. कोरोनाबाबतच नाही तर अन्य आजारांना रोखण्यासाठी ही काळजी घेणे गरजेचे आहे, कारण नवी मुंबईमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
नवी मुंबई शहरातील कोरोना लाट सध्या जरी ओसरत असली तरी नवी मुंबई शहरात मागील वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये डेंग्यू तपासणी आणि धूर फवारणी वाढवावी, अशी मागणी नवी मुंबईच्या नागरिकांकडून होत आहे.
गेल्या वर्षी कोरोना आजाराची लाट असताना नवी मुंबईमधील नागरिकांनी आरोग्य विषयक काळजी घेतल्याने मलेरिया आणि डेंग्यू सदृश रुग्णांमध्ये घट झाली होती, मात्र आता कोरोनाची लाट ओसरत असताना पडलेल्या पावसामुळे नवी मुंबईमधील बाजारपेठ, गावठाण आणि झोपडपट्टी भागात पाणी साचत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील वर्षीपेक्षा यंदा डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
जुलै-2020 च्या अखेरीस नवी मुंबईमध्ये 10 मलेरियाचे रुग्ण, तर डेंग्यू सदृश्य आजाराचे 17 रुग्ण आढळले होते. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले होते.
मात्र, यंदा जुलै 2021 अखेरीस 12 मलेरिया आजाराचे रुग्ण, तर डेंग्यू सदृश्य आजाराचे 38 जण आढळले आहेत. त्यातील 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 9 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
धूर फवारणीची मागणी
कोरोनाचे गांभीयर्र् पाहता आरोग्यविषयक गोष्टींची मागील वर्षी जास्त काळजी घेतली. त्यामुळे इतर रोगांचा प्रादुर्भाव कमी झालेला दिला, परंतु कोरोनाचे गांभीर्य जसजसे कमी झाले तसे काळजी घेणे कमी झाले. परिणामी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईमधील सर्व प्रभागात डेंग्यू तपासणी आणि धूर फवारणी वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.