Breaking News

कर सवलतीसाठीचा उत्तम पर्याय : ईएलएसएस

आर्थिक वर्ष संपताना म्हणजे मार्चमध्येच कर सवलत कशी मिळवावी, असा विचार अनेक जण करतात आणि नको त्या गुंतवणुकीचा निर्णय घेवून बसतात, पण तो विचार आताच केला तर भविष्यात अडचणी न वाढविणारी गुंतवणूक आपण करू शकतो. ती गुंतवणूक म्हणजे ईएलएलएस म्युच्युअल फंड होय.

प्राप्तीकरावर सवलत मिळण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु नेमका पर्याय कसा व कोणता निवडायचा याचा सतत गोंधळ गुंतवणूकदाराच्या मनात असतो. प्राप्तीकर वाचलाच पाहिजे. कमीत कमी काळात गुंतवणूक परतही मिळाली पाहिजे व गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळाला पाहिजे असे अनेक मुद्दे गुंतवणूकदार तपासत असतो. या सर्वांचा सुरेख मेळ असणारा पर्याय म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस). बहुतेक सर्व म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणुकदारांसाठी हा पर्याय उपलब्ध करून देत असतात. या पर्यायामध्ये केवळ प्राप्तीकर वाचतो असे नव्हे तर संपत्तीची निर्मितीदेखील होत असते. प्रत्येक गुंतवणूकदार आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून जास्तीत जास्त प्राप्तीकर वाचवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. जास्तीत जास्त कर सवलत प्राप्त केली तर एक प्रकारे वाचवलेला हा पैसा कमावल्यासारखाच असतो, परंतु प्राप्तीकर वाचवत असताना आपण केलेल्या गुंतवणुकीतून संपत्तीत वाढ होते का हेदेखील गुंतवणूकदाराने तपासले पाहिजे. गुंतवलेल्या रकमेची काळानुसार महागाई दरामुळे मूळ किंमतच (रिअल व्हॅल्यू) कमी झालेली नाही ना याकडे लक्ष असले पाहिजे, कारण गुंतवणूकीवर मिळणारा परतावा, गुंतवणुकीसाठी दिलेला काळ व या काळात महागाई दराचा झालेला परिणाम यामुळे गुंतवणूक परत गुंतवणूकदाराच्या हातात आल्यावर त्याचे मूल्य वाढलेले असणे आवश्यक आहे.

यासाठी सेक्शन 80 सी या कलमाची योग्य माहिती असणे व हे कलम समजावून घेताना मनात निर्माण होणार गोंधळ योग्य पद्धतीने दूर करून गुंतवणूकदाराने आपला कर कसा कमी करून घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्राप्तीकराच्या या कलमाद्वारे सरकार प्रत्येक नागरिकांस गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देत असते. 1,50,000 रुपये इतकी रक्कम उत्पन्नातून वजा करण्याची सवलत या कलमाद्वारे मिळते. ही सवलत मिळवण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदा. ईएलएसएस फंड, पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड), युलिप (युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन), एनएससी (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट), मुदत ठेवी इत्यादी.

या सर्व पर्यायांमध्ये ईएलएसएस हा पर्याय अनेक बाजूंनी सर्वस्वी वेगळा व फायदेशीर ठरतो. सर्व पर्यायांची माहिती घेतल्यावर नेमका पर्याय निवडताना तीन महत्त्वाच्या बाबी तपासून मगच गुंतवणूक करावी.

1)            पैसे परत मिळण्याची मुदत

2)            मिळणारा परतावा

3)            असणारी जोखीम

पैसे परत मिळण्याची मुदत (लिक्विडीटी) – पैशाची तरलता किंवा गुंतवणूक रोख स्वरुपात मिळू शकण्याचा कमीत कमी कालावधी आहे हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे असते. दीर्घकाळासाठी रक्कम गुंतून पडणार असेल तर हा पर्याय निवडताना नीट विचार करावा. सेक्शन 80 सी अंतर्गत करविषयक सवलत घेत असताना पैसे कधी परत मिळणार हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर अचानक मोठ्या रकमेची गरज निर्माण झाल्यास गुंतवणुकीतून पैसे परत घेता येतील हे गुंतवणूकदाराने पैसे गुंतवत असताना लक्षात घेणे आवश्यक आहे. कर सवलत मिळवताना किमान काही काळ पैसे गुंतवणुकीतून काढता येत नाहीत. या मुद्द्यावर ईएलएसएस फंड हा पर्याय गुंतवणुकदारास सोयीचा ठरतो. ईएलएसएस म्युच्युअल फंडात गुंतवणूक कमीत कमी तीन वर्षे ठेवणे आवश्यक असते. तीन वर्षे पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदार गुंतवणुकीतून काही रक्कम किंवा संपूर्ण रक्कम काढून घेऊ शकतो. इतर पर्यायांमध्ये इतकी लवचिता नाही.

परतावा – प्राप्तीकर वाचवत असताना केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा नेमका किती हेदेखील फार महत्त्वाचे असते. ईएलएसएस फंड हे भांडवली बाजारात गुंतवणूक करत असल्याने गुंतवणूकदारांस प्राप्तीकर वाचवत असतानाच जादाचा परतावा कमावण्याची संधी देत असतात. यामुळे केवळ रोखे बाजारात गुंतवणूक असणार्‍या इतर पर्यायांपेक्षा जास्त परतावा कमावण्याची संधी ईएलएसएस पर्यायांमध्ये आहे.

जोखीम – ईएलएसएस फंड हे भांडवली बाजारात गुंतवणूक करत असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगाने वाढणार्‍या चांगल्या व्यावसायिक घराण्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. भांडवली बाजारातील गुंतवणूक नेहमीच दीर्घकालीन काळात फायदेशीर ठरत आली आहे. ईएलएसस फंड हे म्युच्युअल फंडाचे अतिशय अनुभवी गुंतवणूक अधिकारी (फंड मॅनेजर) हाताळत असतात. त्यामुळे जोखीम कमी होते. याच वेळी गुंतवणूक अनेक चांगल्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवल्यामुळे चांगला परतावा देणार्‍या योग्य कंपन्या या गुंतवणूकदारास कमी जोखमीत जादा परतावा देत असतात.

-संदीप भूशेट्टी

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply