पनवेल : बातमीदार
अटक वॉरंटबाबतची नोटीस देण्यासाठी गेलेल्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल येथील प्रोसेस अमलदाराला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुरूशरणजित सिंग याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकुमार गणू पाटील (वय 46 वर्षे) हे गुरूशरणजित सिंग यांना त्यांच्या जवळ असलेल्या नोटीस व अटक वॉरंटबाबत माहिती दिली. या वेळी त्यांनी नोटीस हातात घेतली व ती नोटीस फाडून पाटील यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व पाटील यांना हाकलून देऊन घरात जाऊन दरवाजा बंद करून घेतला. कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-दुचाकीला धडक
चारचाकी गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत 39 वर्षीय इसम जखमी झाला आहे, मनोहर
मोहन पवार (वय 39 वर्ष) हे त्यांची हीरो ग्लँमर मोटारसायकल नंबर एमएच 06 एपी 9831 ही गाडी घेऊन डी-मार्ट कळंबोलीकडे जात असताना नवीन भाजी मार्केट सेक्टर 5, कळंबोली समोर पाठीमागून येणारी इरटीगा कार नं एमएच 46 बिबी 8663 ने मोटारसायकलला पाठीमागून जोरात ठोकर दिली. यात पवार यांच्या हाताला फॅक्चर झाले आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात इरटीगा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-नोकरीच्या आमिषाने फसवणूक
पनवेल : मर्चंट नेव्हीमध्ये शिपवर नोकरी लावतो, असे सांगून खारघर येथे तिघांची तब्बल साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई येथील पीयूषकुमार बबन सिंह (वय 24 वर्षे) यांना बल्क करिअर या कंपनीत भरती असून प्रतिमहिना 700 डॉलरप्रमाणे पगार
मिळणार असल्याचे पंकज सिंह यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे पीयूषकुमार यांनी एक लाख 45 हजार रुपये पंकज सिंह यांच्या बँक खात्यात जमा केले. या वेळी पंकज सिंह याने एक आठवडयात जॉब मिळेल, असे सांगितले होते. एक आठवड्यानंतर त्यांच्याकडे पीयूषकुमार यांनी विचारणा केली असता त्याने व्यवस्थित उत्तर दिले नाही. या वेळी नोकरी देत नसाल, तर पैसे परत करा, असे पीयूषकुमार यांनी पंकजला सांगितले, मात्र पंकज सिंह याने पैसे परत दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाली असल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पंकज सिंह याने अशाच प्रकारे एक लाख 20 हजार रुपये ओमनारायण जगदीश वाजपेयी यांच्याकडून व 75 हजार रुपये परवेज आलम यांच्याकडून घेऊन त्यांना नोकरी न देता फसवणूक केली आहे.
-नोकराचाच सोन्यावर डल्ला
पनवेल : कामोठे येथील दागिने बनविण्याचे काम करणार्या नोकराने दोन लाख 43 हजार रुपयांच्या दागिने व मोबाईलची चोरी केली आहे. कामोठे पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
राजु तारापदो पाकीरा (वय 28) यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा धंदा आहे. ते
कामोठे येथे सोनारांकडून सोन्याचे लगड घेऊन त्याची ऑर्डरप्रमाणे दागिने बनविण्याचे, तसेच सोन्याच्या अंगठ्यांवर खडे बसविण्याचे ऑर्डरप्रमाणे काम करतात. या वेळी त्यांनी जहीर राजाउद्दीन याला कलकत्याहून कामासाठी बोलावले. त्याने काही काळ अंगठ्यांमध्ये खडे बसविण्याचे काम केले. त्यानंतर त्याने येथील दोन लाख 38 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, पाच हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.