प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात होऊ घातलेल्या 14 हजार 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसह मार्च किंवा एप्रिलच्या मध्यात होण्याची शक्यता असलेल्या पाच महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपाच्या प्रदेशस्तरीय बैठकांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 6) पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकांमध्ये अतिशय चांगले यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजप महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी सीटी रवी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर कोअर कमिटी सदस्य, प्रदेशचे सर्व मोर्चांचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना काळात थोडी अनियमितता आली असली तरीदेखील एकत्र बसून विचारविनिमय करणे ही भाजपची परंपरा आहे. प्रदेशच्या पदाधिकार्यांची, कोअर कमिटीची, कार्यकारिणीची, विविध मोर्चांच्या अध्यक्षांची नियमित बैठक होत असते. त्यामुळे दोन दिवस त्याच नियमितपणे होणार्या बैठकांचा भाग म्हणून सर्व बैठका झाल्या. कोरोना काळात व्हर्च्युअल बैठका झाल्या, सेवा झाली, परंतु संघटन या विषयात आता थोडा वेळ द्यावा लागेल. त्यामुळे सर्व बैठका लाईनवर झाल्या.
ज्या सहा विधान परिषद निवडणुका झाल्या त्याची या बैठकांमध्ये समीक्षा झाली आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना झाली. 28 कार्यकर्ते आगामी तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवासाला निघाले आहेत. काही जणांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. हे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे, किती ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत, त्यातील किती गावे ही भाजपच्या सरपंच करण्याच्या दिशेने जातील अशी सर्व योजना आखतील. 14 हजार 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगले यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बूथस्तरापर्यंत काम कसे वाढेल, पाच महानगरपालिका व 92 नगरपंचायतींच्या निवडणुका साधारण मार्चअखेर किंवा एप्रिलच्या मध्यात होणार आहेत या संदर्भातदेखील बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राम मंदिर उभारणीसाठी सुरू असलेल्या निधी संकलनात भाजपचा मोठा सहभाग असणार आहे. त्या दृष्टीनेदेखील चर्चा या बैठकीत झाली असल्याचे पाटील या वेळी म्हणाले.