Breaking News

‘गोल्डन बॉय’ नीरजवर बक्षिसांचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. या सुवर्ण कामगिरीबद्दल त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरूच आहे. आता आयपीएलमधील धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) त्याचे कौतुक करीत बक्षीस जाहीर केले आहे.
सीएसकेकडून नीरज चोप्राला एक कोटी रुपये देण्यात येतील. सीएसकेच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्हाला एक भारतीय म्हणून नीरजचा अभिमान आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील त्याच्या यशामुळे लाखो भारतीयांना खेळात येण्यासाठी प्रेरणा मिळेल. यासह ते खेळाची सर्वोच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करतील. नीरजच्या सन्मानार्थ फ्रेंचायझीकडून 8758 क्रमांकाची विशेष जर्सीही जारी केली जाईल.
नीरजवर सर्व बाजूंनी बक्षिसांचा पाऊस पडला आहे. त्याला 12 कोटींची रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. हरयाणा सरकारने सहा कोटी देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय पंजाब सरकारकडून दोन कोटी, बीसीसीआय आणि सीएसकेकडून प्रत्येकी एक कोटी, मणिपूर सरकारकडून एक कोटी आणि भारत सरकारकडून नियमानुसार 75 लाख रुपये दिले जाणार आहेत.
महिंद्रा देणार गाडी भेट
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने नीरज चोप्राला त्यांची आगामी एक्सयूव्ही 700 एसयूव्ही गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर याबाबत घोषणा केली. महिंद्रा कंपनी आपली ही फ्लॅगशिप गाडी येत्या आठवड्यात लॉन्च करणार आहे. महिंद्रा आपल्या आगामी गाडीचा जोरदार
प्रचार करत आहे. या वर्षातील सर्वांत अपेक्षित गाड्यांपैकी ती एक गाडी आहे.
वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
पानिपत ः भारताच्या 23 वर्षीय नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि इतिहास रचला! भारतासाठी हा मोठा सुवर्णक्षण ठरला. याच अभूतपूर्व कामगिरीच्या निमित्ताने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे वडील सतीश कुमार आपल्या मुलाच्या यशाने भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
आपल्या मुलाच्या विजयाबद्दल बोलताना सतीश कुमार म्हणाले की मला माझा आनंद शब्दात व्यक्त करता येणे कठीण आहे. मी अत्यंत आनंदी आहे कारण माझ्या मुलाच्या प्रयत्नांमुळे, यशामुळे आपल्या देशाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सतीश कुमार एएनआयशी बोलत होते. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply