मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी ‘शिवबंधन’ हाती बांधले.
काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेली घुसमट या वेळी प्रियंका यांनी बोलून दाखवली. महिलांसाठी काम करायला आवडेल असे सांगून शिवसेनेचा राज्यातच नव्हे; तर देशातही प्रचार-प्रसार करेन, असे त्या म्हणाल्या.
‘मातोश्री’वर झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली, परंतु या गंभीर प्रकरणाची पक्षाने दखल घेतली नसल्याचा आरोप प्रियंकांनी केला आहे.