व्रोक्लॉ ः वृत्तसंस्था
भारताची तिरंदाज कोमलिका बारीने गुरुवारी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतील (21 वर्षांखालील) रीकर्व्ह प्रकाराची अंतिम फेरी गाठली. कोमलिकाने भारतासाठी पदकनिश्चिती केली असून तिला सलग दुसरे जागतिक जेतेपद मिळवण्याची संधी आहे. जमशेदपूरच्या 19 वर्षीय कोमलिकाने यापूर्वी 18 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. गुरुवारी तिने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या कॅसी कौफहोल्डला 6-4 (28-27, 25-28, 28-26, 25-30, 29-25) असे पराभूत केले. आता रविवारी होणार्या अंतिम लढतीत तिच्यासमोर स्पेनच्या एलिआ कॅनल्सचे कडवे आव्हान असेल. कोमलिकाने ही लढत जिंकल्यास दीपिका कुमारीनंतर अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी तिरंदाज ठरेल. दीपिकाने 2009 आणि 2011मध्ये अनुक्रमे कॅडेट आणि कनिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले होते.