अलिबाग : प्रतिनिधी
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या छताला गळती लागली आहे. त्यातून वरच्या मजल्यावरील दूषित पाणी ठिबकत आहे. छताला बुरशी आली आहे. अशा प्रदूषित वातावरणातच रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र इमारतीतील अनेक भागात छत पडणे, पाणी गळणे हे प्रकार सुरूच असतात. तीन चार वर्षांपूर्वी बाह्यरुग्ण इमारतीतील पहिल्या मजल्यावरील शस्त्रक्रिया कक्षाचे नव्याने बांधकाम केले होते. तेथेच आता गळती लागली आहे. शस्त्रक्रिया कक्षात शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर, परिचारिका हात स्वच्छ करतात त्या बाजूच्या भागातील कक्षाचा छत निकृष्ट कामामुळे दूषित पाण्याने पाझरू लागला आहे. पडणारे पाणी पसरू नये, म्हणून तिथे बादल्या लावल्या आहेत, तरीही हे पाणी लादिवर पसरले जात आहे. त्यामुळे या भागात अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे.
शस्त्रक्रिया कक्षात गळती सुरू आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. या कामासोबत इतर कामांची निविदा बांधकाम विभागाने काढली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी शस्त्रक्रिया कक्ष रिकामा करून दिला जाईल. लवकरच हा विभाग दुसरीकडे हलविण्यात येईल.
-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड, अलिबाग.