Breaking News

रणधुमाळीची चाहूल

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची प्रतीक्षा एकीकडे सुरू असताना दुसर्‍या बाजूला राज्यात राजकीय पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आणखी सहा महिन्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऐन भरात आलेली असेल. त्या रणधुमाळीची चाहूल आतापासूनच लागू लागली आहे. तिसर्‍या लाटेचा प्रभाव आणि भीती जसजशी ओसरेल तसतसे पालिका निवडणुकांचे युद्ध पेटत जाईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गेली जवळपास चार दशके मुंबई महानगरपालिका नावाची सोन्याची कोंबडी शिवसेनेच्या खुराड्यात बंदिस्त आहे. तिची सोडवणूक करण्यासाठी कुठलीही कसर सोडायची नाही असे विरोधी पक्षांनी ठामपणे ठरवलेले दिसते. स्वबळाचे नारे देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच मुंबई महापालिका निवडणूक आणि अन्य स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. याचा अर्थ एवढाच की राज्य सरकारात एकमेकांच्या साथीने सत्ता काबीज करणार्‍या महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्थानिक निवडणुका एकत्र लढतीलच असे नाही. किंबहुना मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी सत्ताधारी शिवसेनेला कोणाबरोबर वाटून खायची नाही. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा प्रभाव नाही. काँग्रेसचे मात्र सुमारे 29 नगरसेवक पालिकेत आहेत. त्यांच्या जोरावरच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असावा. असे असले तरी शिवसेनेला पुढील वर्षी येणार्‍या निवडणुका फारशा सोप्या जाणार नाहीत हे उघड आहे. शिवसेनेला कडवी टक्कर देऊ शकणार्‍या भारतीय जनता पक्षाने आतापासूनच दंड थोपटले आहेत. याशिवाय राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचे कामदेखील अतिशय निराशाजनक राहिले आहे. विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी कितीही मोठमोठे दावे करत असली, तरी परिस्थिती नेमकी काय आहे हे सारे जाणतातच. विकासाच्या पोकळ दाव्यांबद्दलचा नेमका हाच आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपवर केला जातो. पुण्यामध्ये याचे गमतीदार उदाहरण सध्या पाहायला मिळते आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या विकासकामांची पोलखोल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, तर भाजपने महाविकास आघाडीचे एक भरीव विकासकाम दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा अशी प्रतिउत्तर देणारी स्पर्धा जाहीर केली आहे. कधी विधिमंडळात, कधी महापालिकेत, तर कधी रस्त्यावर आमनेसामने येणार्‍या या पक्षांचे युद्ध आता समाजमाध्यमांवर पेटले आहे. परस्परांवरील विनोद आणि शेरेबाजीला उधाण आले असून काही दिवसांत पुण्याप्रमाणेच मुंबईत देखील अशाच प्रकारची रंगत अनुभवायला मिळेल असे दिसते. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे सध्या तरी सारेच राजकीय पक्ष जपून पावले टाकत आहेत. केंद्र सरकारात मंत्रिपदाची शपथ घेतलेले नामदार नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची जबाबदारी भाजपने दिली असल्याचे वृत्त आहे. राणे यांच्यासारखा आक्रमक आणि तोडीस तोड उत्तर देणारा नेता असेल, तर सत्ताधारी शिवसेनेसमोर ते मोठेच आव्हान ठरेल यात शंका नाही. शिवसेनेला डिवचण्यात राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांची कशी फे-फे उडते हे देखील लोकांनी पाहिले आहे. सत्तेसाठी एकमेकांशी जुळवून घेतलेल्या महाविकास आघाडीत पालिका निवडणुकांच्या मुद्द्यावर तरी हातमिळवणी झालेली दिसत नाही. एकंदरीत पुढील वर्षी होणार्‍या पालिका निवडणुकांना आतापासूनच रंग भरू लागला आहे हे निश्चित.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply