पाली ः प्रतिनिधी
शिवऋण प्रतिष्ठान, महाराष्ट्र व वनविभाग सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) पालीतील सरसगड किल्ल्यावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या वेळी तब्बल 60हून अधिक देशी व उपयोगी झाडांची लागवड करण्यात आली. शिवऋण प्रतिष्ठानने आपल्या कृतिशील कार्यातून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड व त्यांचे संगोपन करण्यासाठी पुढे आले पाहिजे या उद्देशाने माळरानावर हरितक्रांती आणण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य अहोरात्र काम करीत आहेत. शिवऋण प्रतिष्ठानचे सदस्य, ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी पहाटेच कुदळ व फावडे घेऊन सरसगडावर उपस्थित होते. या वेळी सर्वांनी मिळून किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर वृक्षारोपण केले. टेक्नॉलॉजीप्रमाणेच जंगल आणि परिसरदेखील विकसित केला पाहिजे याकरिता शिवऋण प्रतिष्ठान वृक्षारोपण मोहिमा राबवत आहे. सुधागड परिक्षेत्र वनाधिकारी समीर शिंदे, जांभूळपाडा परिमंडळ वनाधिकारी दीपक तळेले, वनरक्षक वैशाली बोबडे यांनी वृक्षारोपण मोहिमेस सहकार्य, मार्गदर्शन व तांत्रिक सल्ले देऊन मोलाचे सहकार्य केले. तसेच पाली ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर याचेही सहकार्य लाभले. या मोहिमेत केतन म्हसके, किशोर खरीवले, सचिन डोबले, गंगाधर पांडव, चेतन पांडव, सुजीत जगताप, शेरमकर, ओमकार म्हसके, अक्षय शिंदे, प्रसाद म्हसके, तुषार शिंदे, हृतिक मोरे आदी शिवऋण सदस्य सहभागी झाले होते.