विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलेच माहीत आहे. सरकारला आम्ही मदतच करीत आहोत, पण खोटे बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 27) येथे केली. देशातील सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधील मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.
फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचा समाचार घेताना म्हटले की, मी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी तास न् तास बैठका घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढ्या बैठका कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी घेतल्या असत्या तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती.
खरे बोलायचे असेल तर एकच माणूस पुरेसा असतो, मात्र फेकमफाक करायची असेल तर तीन माणसे लागतात. अशाच प्रकारे तीन मंत्र्यांनी एकत्र येऊन पूर्णपणे विसंगत माहिती देऊन माझ्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. एक तर त्यांच्याकडे असलेली माहिती अपुरी आहे. माहिती न घेता आले आहेत किंवा माहिती असूनही ते चुकीचे बोलत आहेत, असे फडणवीस म्हणाले.